Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा! : डॉ. मिलिंद भोई

अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा! : डॉ. मिलिंद भोई

‘अंमली पदार्थांना नकार… यशस्वी जीवनाकडे वाटचाल!’ उपक्रमात महाविद्यालयीन तरुणाईचे प्रबोधन
पिंपरी : ‘अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा आहे. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत परत येऊ शकत नाही. त्याप्रमाणेच चुकून किंवा कुतूहलाने अंमली पदार्थांचे सेवन केल्यास कालांतराने त्याचे पर्यवसान मृत्यूत होते!’ असा गंभीर इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांनी पिंपरी – चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सभागृह, आकुर्डी प्राधिकरण येथे मंगळवार २५ ऑगस्ट रोजी प्रमुख वक्ता म्हणून बोलताना दिला.

viara vcc
viara vcc

लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी – २), रिजन ३, लायन्स क्वेस्ट, भोई प्रतिष्ठान आणि पीसीएटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अंमली पदार्थांना नकार… यशस्वी जीवनाकडे वाटचाल!’ या विशेष उपक्रमात लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रेयस दीक्षित, लायन्स क्वेस्ट डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन प्रदीप कुलकर्णी, लायन्स रिजन चेअरपर्सन सलीम शिकलगार, लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या अध्यक्षा अनुजा करवडे, रवी सातपुते, पीसीएटी डीन डाॅ. शीतल रवंदळे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. भोई यांनी खुमासदार शेरोशायरी सादर करुन आपली सजगता एखाद्या अल्लड तरुण अथवा तरुणीचा मृत्यू रोखू शकते आणि त्याच्या कुटुंबाला मौलिक सुख प्रदान करू शकते म्हणून विद्यार्थी, पालक, अध्यापक यांनी या उपक्रमात सहभागी होऊन अंमली पदार्थांच्या महाबलाढ्य राक्षसाला गाडून टाका, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकातून प्रदीप कुलकर्णी यांनी, जगातील सर्वाधिक तरुणाईचा देश अशी ख्याती असलेल्या भारतातील समृद्ध पंजाबची आता अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेमुळे ‘उडता पंजाब’ अशी जगात नामुष्की होत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील तरुणाईला यापासून वाचविण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती दिली. श्रेयस दीक्षित यांनी, जीवनाच्या प्रवासात सुखदुःख, चढउतार वाट्याला येतात. या कसोटीच्या काळात मोहाचा एक क्षण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, ही जाणीव करून दिली. सलीम शिकलगार यांनी, ‘अंमली पदार्थांना नकार…’ या उपक्रमाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले; तर डॅा. शीतल रवंदळे यांनी, २०४७ मधील संपूर्ण विकसित भारत आजच्या निर्व्यसनी नवयुवकांच्या सामर्थ्यात आहे, असे आवाहन केले.

याप्रसंगी भोई प्रतिष्ठान निर्मित एका विशेष ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे विविध प्रकार, औत्सुक्य किंवा वैफल्यातून त्याच्या विळख्यात सापडणारी तरुणाई, त्यातून होणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अब्जावधी रुपयांची अवैध उलाढाल, व्यसनाधीन कोवळ्या तरुणांचा हृदयद्रावक अंत आणि संपूर्ण कुटुंबाची ससेहोलपट, व्यसनी व्यक्तीची लक्षणे, तिचे पुनर्वसन अशा बाबींवर सर्वंकष माहिती देताना देशातील नामवंत व्यक्तींनी याबाबत केलेले आवाहन प्रदर्शित करून संपूर्ण सभागृहाला अंतर्मुख केले.

लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सचे पदाधिकारी, भोई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि पीसीएटीचा कर्मचारीवर्ग यांनी संयोजनात परिश्रम घेतले. उज्ज्वला कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अनुजा करवडे यांनी आभार मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"