शाळा महाविद्यालयाजवळील पान टपऱ्यांवर कारवाई!

पिंपरी : शाळा आणि महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ आणि सिगरेटची विक्री करणाऱ्या 75 पान टपऱ्यांवर मे ते ऑगस्ट 2026 या चार महिन्यात निष्काशनाची कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेच्या पथकांनी ही कारवाई केली.

शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी दिले होते. त्यानुसार चारही परिमंडळातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोहीम राबवण्यात आली. शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाची विक्री तसेच सेवन होत असल्याने लहान मुलांमध्ये कुतूहल निर्माण होऊन ते व्यसनाकडे ओढले जाण्याचा धोका असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मे ते ऑगस्ट अखेर झालेल्या कारवाईत परिमंडळ तीन मध्ये सर्वाधिक 23 पान टपऱ्यांचे निष्काशन करण्यात आले. परिमंडळ दोन मध्ये 18, परिमंडळ एक आणि चार मध्ये प्रत्येकी 17 टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर, अप्पर आयुक्त सारंग अवाड, बसवराज तेली आणि चारही परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार आणि महापालिकेच्या पथकाने ही मोहीम राबवली. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

