Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई!

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई!

दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील ८३ हजार ९९ चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामे व अतिक्रमणे हटविली
पिंपरी, : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात महानगर पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि अतिक्रमण मुख्य कार्यालय उप आयुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व १० क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात आलेल्या या कारवाईत एकत्रितपणे सुमारे ८३ हजार ९९ चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.

viara vcc
viara vcc

महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये आर.सी.सी. स्वरूपाची अनधिकृत बांधकामे, अनधिकृत पत्राशेड, नव्याने सुरू असलेली बांधकामे तसेच पदपथावरील अनधिकृत टपऱ्या, हातगाडे आणि इतर अतिक्रमणांचा समावेश आहे.

अ क्षेत्रीय कार्यालय
अ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील साईनगर, निगडी परिसरात अंदाजे ३ हजार ४९८ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील शगुन चौक, पिंपरी मार्केट, एम्पायर ब्रिजखाली चिंचवड आणि वाल्हेकरवाडी परिसरात १० हजार ५३८ चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. क क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत चिखली, कुदळवाडी, शिवरोड, रवी रंजन वजन काटा चिखली आणि डी-मार्ट शेजारी चिंचवड परिसरात १२ हजार ७२३ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.

ड क्षेत्रीय कार्यालय
ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ५ हजार ४०० चौरस फूट, तर ई क्षेत्रीय कार्यालयाच्या भोसरी व मोशी परिसरात ७ हजार ९६५ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. फ क्षेत्रीय कार्यालयाच्या मोरे वस्ती, चिखली, तळवडे आणि नेवाळे वस्ती परिसरात सर्वाधिक १९ हजार ४०० चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.

ग क्षेत्रीय कार्यालय
ग क्षेत्रीय कार्यालयाच्या राजवाडे नगर, गोकुळवाडी, पवनानगर, स्वप्ननगरी कॉलनी, काळेवाडी, डोंगरे कॉर्नर, मंगल नगर आणि थेरगाव परिसरात १३ हजार ३५ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. ह क्षेत्रीय कार्यालयाच्या जुनी सांगवी परिसरात १ हजार ८६ चौरस फूट, ज क्षेत्रीय कार्यालयाच्या वाल्हेकरवाडी, दत्त मंदिर रोड वाकड, पिंपळे निलख व किवळे परिसरात ६ हजार २८ चौरस फूट, तर ल क्षेत्रीय कार्यालयाच्या भोसरी, इंद्रायणी नगर, संत तुकाराम नगर आणि पिंपरी परिसरात ३ हजार ४२६ चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली.

शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी तसेच अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून यापुढेही आवश्यकतेनुसार नियमित कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवणे तसेच अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करणे ही महापालिका प्रशासनाची सातत्यपूर्ण जबाबदारी आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकामे अथवा अतिक्रमणे करू नयेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. शहराचे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध स्वरूप कायम ठेवण्यासाठी यापुढेही क्षेत्रनिहाय नियमित कारवाई सुरू राहणार आहे. — डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"