Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
सांस्कृतिक

‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर : भाऊसाहेब भोईर

‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर : भाऊसाहेब भोईर


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शनिवारी चिंचवड येथे पुरस्कार सोहळा
पिंपरी : २१ वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर करण्यात आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा शनिवारी, (दि. २९ ऑगस्ट) सायं. ५ वाजता, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

viara vcc
viara vcc

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

या सोहळ्यास विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, आमदार अमित गोरखे, मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराध्यक्ष योगेश बहल आदींसह कला, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

“आशा भोसले” पुरस्काराचे स्वरूप
या पुरस्काराचे स्वरूप रु. १,११,०००/- (एक लाख ११ हजार रुपये) रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम रंगणार आहे. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या सुरेल आवाजाची छाप उमटविणाऱ्या गानसम्राज्ञी आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येईल. हा संपूर्ण सोहळा सर्व संगीतप्रेमी व नागरिकांसाठी विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी प्रेक्षकांनी आसनस्थ व्हावे. पिंपरी चिंचवड शहर परिसरातील तमाम रसिकांनी या सांगीतिक व सांस्कृतिक मेजवानीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, यांनी केले आहे.

नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या या प्रतिष्ठित आशा भोसले पुरस्कारासाठी स्वतंत्र निवड समिती आहे. समितीमध्ये ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, वंदना घांगुर्डे, दिलीप काटकर, राजेशकुमार साकला आणि भाऊसाहेब भोईर यांचा समावेश आहे.

चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष किरण येवलेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बंग, सहकार्य संतोष रासने, गौरी लोंढे, सह कोषाध्यक्ष संतोष शिंदे, सदस्य सुदाम परब आदी उपस्थित होते.

या पुरस्काराची सुरुवातीपासूनच गौरवशाली परंपरा राहिली आहे. सन २००२ पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेतर्फे हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दिला जातो. यापूर्वी हा सन्मान गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान (शांतनू मुखर्जी) यांसारख्या संगीतातील दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे.

shreya ghoshal
shreya ghoshal

पुरस्काराच्या मानकरी श्रेया घोषाल
भारतीय संगीत विश्वात आपल्या सुमधुर आवाजाने स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या श्रेया घोषाल यांनी वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षापासून संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. कोटा येथे पं. महेशचंद्र शर्मा आणि मुंबईत मुक्ता भिडे यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी झी टीव्ही वरील ‘सारेगामापा’ (चिल्ड्रेन स्पेशल) चे विजेतेपद पटकावले. ‘देवदास’ (२००२) चित्रपटातील ‘बैरी पिया’ आणि ‘डोला रे’ या गाण्यांनी त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीची यशस्वी सुरुवात झाली. हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, आसामी, भोजपुरी आणि पंजाबी अशा २० हून अधिक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी गायली आहेत. ‘जादू है नशा है’, ‘बरसो रे’, ‘तेरी ओर’, ‘ये इश्क हाय’, ‘दीवानी मस्तानी’ तसेच मराठीतील ‘जीव दंगला’ व ‘मेरे ढोलना’ ही त्यांची काही प्रसिद्ध गाणी आहेत.

श्रेया घोषाल यांना ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ‘देवदास’, ‘पहेली’, ‘जब वी मेट’, ‘जोगवा’ इत्यादी), ७ फिल्मफेअर पुरस्कार (आरडी बर्मन न्यू म्युझिक टॅलेंट अवॉर्डसह) आणि १० हून अधिक फिल्मफेअर साऊथ पुरस्कार. याशिवाय अमेरिकेतील ओहायो राज्याने २६ जून हा दिवस “श्रेया घोषाल डे” म्हणून घोषित केला आहे. लंडन येथील युनायटेड किंगडमच्या (लंडन) संसदेत त्यांना भारतीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी विशेष सन्मानाने गौरविले गेले आहे. भारतातील १०० प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तींच्या “फोर्स सेलिब्रेटी १००” यादीत त्यांचा अनेकदा समावेश झाला आहे. झी सिने, स्क्रीन आणि अनेक राज्य शासनांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"