शिपाई पदासाठी महापालिकेचे बनावट नियुक्तीपत्र!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शिपाई पदावर नोकरी देण्याचे आमीष दाखवून एका तरुणांकडून पैसे घेतले. तरुणाला बनावट सही शिक्क्याचे नियुक्तीपत्र आणि उमेदवाराच्या नावाचे परिपत्रक देऊन नोकरी लागल्याची खात्री पटवून दिली. तरुणाने महापालिकेत याबाबत चौकशी केली असता अशा प्रकारे कोणतीही भरती प्रक्रिया राबवली नसल्याचे उघडकीस आले. यानंतर संबंधित तरुणाने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सुरज सुनील नांगरे (वय 26, रा. काळेवाडी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार वैष्णव कालिदास शेळके (वय 27) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .हा प्रकार नऊ जानेवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत पिंपरी चिंचवड महापालिकेत घडला. पिंपरी चिंचवड महापालिकेने काही महिन्यांमध्ये कोणतीही पदभरती केलेली नाही. वैष्णव शेळके आणि फिर्यादी सुरज हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत वैष्णव याने सुरज यांना मनपामध्ये शिपाई पदासाठी भरती सुरू असल्याचे सांगून त्यांना मनपामध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले.
सुरज यांचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून वेळोवेळी सहा हजार पाचशे रुपये घेतले. सुरज यांना मनपा मध्ये नोकरी लावल्याचे सांगून त्यांना मनपाच्या नावाने सही शिक्का असलेले बनावट नियुक्तीपत्र आणि उमेदवारांच्या नावाचे परिपत्रक तयार करून सुरज यांना पाठवले. महापालिकेत नोकरी लागल्याचा आनंद सुरज यांनी व्यक्त केला. नियुक्ती पत्रानंतर महापालिकेच्या मुख्य कार्यालयात जाऊन सुरज याने चौकशी केली. तिथे अशा प्रकारची कोणतीही भरती प्रक्रिया राबवली नसल्याचे सांगण्यात आले. सुरज यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देखील या प्रकरणी कारवाई करण्याचा अर्ज संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे. .

