पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून फसवणूक!

अट्टल रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक; खंडणी विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून बनावट कागदपत्रे व नियुक्तीपत्रे तयार करून पाच लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अट्टल रेकॉर्डवरील गुन्हेगारास खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.

याप्रकरणी प्रतीक राजेश धाईंजे (वय 26, रा चक्रपाणि वसाहत ,शास्त्री चौकाजवळ, आळंदी रोड भोसरी, मूळ- रा. अकलूज ,जि. सोलापूर ) यास खंडणी विरोधी पथकाने अटक केली. पाणीपुरवठा विभागात नियुक्तीपत्र मिळालेल्या व्यक्तीने फसवणूक करण्यात आल्याने त्याने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने बनावट कागदपत्रे व नियुक्तीपत्र तयार करून 1 लाख 14 हजार 112 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. आरोपी प्रतीक धाईंजे यास पुढील कारवाईकासाठी भोसरी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी प्रतीक धाईंजे याने यापूर्वी म्हाडा मध्ये स्वस्त घर मिळवून देतो असे सांगून अनेक लोकांची फसवणूक केली आहे. त्याने 22 लाख 41 हजार 760 रुपये उकळल्याचे उघड झाले होते. त्याबाबत भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस हवालदार प्रदीप पोटे, प्रदीप गोडांबे, किरण जाधव, किशोर कांबळे यांच्या पथकाने केली .

