दारूच्या नशेत पत्नीवर संशय घेऊन डोक्यात घातला खलबत्ता!

पिंपरी : दारूच्या नशेत चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात दगडाचा खलबत्ता घालून जीव घेणं हल्ला केला. थेरगाव येथील गुरुनानक कॉलनी परिसरात शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

याप्रकरणी सृष्टी महादू सोनवणे (वय 24, मूळ- रा. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. महादू विनायक सोनवणे (वय 31, रा. गुरुनानक कॉलनी, थेरगाव) यांच्या विरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दारू पिऊन घरी आला आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घालू लागला. रागाच्या भरात शिवीगाळ करत त्याने घरातील दगडाचा खलबत्ता पत्नीच्या डोक्यात मारला. तसेच दगडाचा बत्ता तोंडावर मारून गंभीर जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

खराळवाडीत हॉटेल पार्किंग मध्ये तीन पत्ती जुगारावर छापा!
पिंपरी : हॉटेलच्या पार्किंग मध्ये पैशावर तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या चार जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. गांधीनगर, पिंपरी येथील सिटी प्राइड हॉटेलच्या पार्किंग मध्ये शनिवार 12 सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई अनिल लालसो मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. अमित मारुती बनपट्टे (वय 40), सचिन एकनाथ मंगळवेढेकर (वय 46), संदीप मारुती बनपट्टे (वय 45) आणि चंद्रकांत अर्जुन नलावडे (वय 56, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पार्किंग मध्ये तीन पत्ती जुगार खेळत होते. पोलिसांनी छापा मारून 2400 रुपयांची रोख रक्कम आणि 73 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल जप्त केले. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

