कारवर बनावट ‘आमदार लोगो’ लावण्याचे फॅड; तिघांवर गुन्हा दाखल!

पिंपरी : कायद्याचा कोणताही धाक नसल्याने कायदेशीर परवानगी नसताना दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी केलेल्या तपासणीत बनावट ‘आमदार लोगो’ वापरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी वाहतूक विभागाच्या कार्यासमोर शनिवार 12 सप्टेंबर रोजी आमदार विधानसभा महाराष्ट्र राज्य असा लोगो लावून फिरणाऱ्या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .याशिवाय वाकड जकात नाका येथे शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे लोगो वापरून फिरणाऱ्या वाहनावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

भोसरी वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर कृष्णा गोविंद अंबर (वय 26, रा.मोशी), मालती महादेव चव्हाण (रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी वाहतूक विभागातील पोलीस शिपाई सुरेश ज्ञानोबा शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. पुणे नाशिक रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना काळ्या रंगाची फॉर्च्यूनर कार पोलिसांच्या निदर्शनास आली. कारच्या पुढील आणि मागील काचेवर आमदार विधानसभा महाराष्ट्र राज्य असा लोगो लावण्यात आला होता.

वाकड नाका येथे वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत नवीन शेख (वय 50, रा. मोहननगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी वाहतूक विभागातील सहाय्यक पोलीस फौजदार मेराज जमूद्दीन सौदागर यांनी फिर्याद दिली आहे .वाकड नाका महामार्गावर वाहनांची तपासणी सुरू असताना शेख यांच्या स्विफ्ट कारच्या काचेवर अशोक स्तंभासह महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार असा लोगो चिटकवलेला आढळला. आर्थिक फायदा, व्हीआयपी सवलत आणि कपटी उद्देशाने नागरिकांची दिशाभूल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

