पिंपरी चिंचवड महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाच्या विकेंद्रीकरणासाठी जागा केल्या प्रस्तावित!

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुर्गंधविरहित ट्रान्स्फर स्टेशनसह विविध प्रकल्प उभारणार
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शाश्वत आणि विकेंद्रित पद्धतीने करण्यासाठी महानगरपालिकेने विविध भागांतील जागा प्रस्तावित केल्या आहेत. मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचा वाढता भार लक्षात घेता, प्रभाग स्तरावर घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मोशी कचरा डेपो येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याने शहरातील विविध भागांतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रभागनिहाय विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने महानगरपालिकेच्या आरक्षित जागांची स्थळपाहणी करण्यात आली असून, प्राथमिक स्तरावर काही जागा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

प्रस्तावित जागांवर त्यांच्या क्षेत्रफळानुसार विविध प्रकारच्या घनकचरा प्रक्रिया सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, ऊर्जा निर्मिती, जैविक कचऱ्यापासून बायोगॅस व बायोफ्युएल निर्मिती तसेच प्लास्टिक कचऱ्यापासून विविध उत्पादने तयार करण्याच्या सुविधांचा समावेश असेल.
सदर जागांची तांत्रिक योग्यता, उपलब्ध क्षेत्रफळ, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणीय बाबी आणि इतर आवश्यक निकषांची तपासणी सुरू आहे. संबंधित सर्व बाबींचा अभ्यास करून तसेच आवश्यक त्या संमती व मान्यता प्राप्त करून अंतिम जागा निश्चित करण्यात येणार आहेत. या विकेंद्रित व्यवस्थेमुळे कचऱ्याची वाहतूक अधिक कार्यक्षम होण्यास, मोशी कचरा डेपोवरील भार कमी करण्यास तसेच शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया व विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे.
प्रस्तावित करण्यात आलेल्या जागा
प्रभाग क्रमांक १३ मधील सेक्टर क्रमांक २२ येथे पाण्याच्या टाकीजवळ
प्रभाग क्रमांक १७, चिंचवड, आरक्षण क्र. १/८९, सर्व्हे नं. ११३, ११४ व ११६ पैकी
प्रभाग क्रमांक १८, चिंचवड, आरक्षण क्र. २२१
प्रभाग क्रमांक १०, दत्तनगर, राम मंदिराजवळ
सर्व्हे नं. ७७, दिघी गायरान
चोविसावाडी, आरक्षण क्र. २/१६
पुनावळे, सर्व्हे नं. २३/६/३ पै., २३/६/२ पै., २३/५ पै., २३/१ पै., २३/६/४ पै., २३/२/१ पै. व २३/२/२
पुनावळे, सर्व्हे नं. २६/१/६, २६/३/१ व २६/३/२ पै.
गवळीमाथा
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जागेबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विकेंद्रीकरणावर भर देण्यात येत आहे. मोशी डेपोवरील कचऱ्याचा भार कमी करण्यासोबतच कचऱ्याचे संकलन, वाहतूक, वर्गीकरण आणि प्रक्रिया अधिक कार्यक्षम पद्धतीने करण्याचे नियोजन आहे. प्रस्तावित जागांची तांत्रिकदृष्ट्या तपासणी करून या जागांची अंतिम निश्चिती महापौर, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगरसदस्य यांच्या संमतीने केली जाणार आहे. पर्यावरणपूरक आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने या प्रकल्पांची उभारणी करण्यात येईल. डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

