फक्त मुद्द्याचं!

29th May 2026
पिंपरी-चिंचवड

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २४x७ पूर नियंत्रण कक्षाची स्थापना!

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यालय स्तरावर २४x७ पूर नियंत्रण कक्षाची स्थापना!

पिंपरी : पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.या नियंत्रण कक्षांमुळे नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देणे, आपत्कालीन परिस्थितीचे समन्वय साधणे आणि आवश्यक मदतकार्य तत्काळ पोहोचवणे शक्य होणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, सुसज्ज संप्रेषण व्यवस्था तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे मान्सून काळात शहरातील पूर व्यवस्थापन अधिक प्रभावी, जलद आणि समन्वयित पद्धतीने पार पाडणे सुलभ होणार आहे.

viara vcc
viara vcc

पूरनियंत्रण, बचावकार्य, मदत शिबिरे, आरोग्य सुविधा व आपत्कालीन प्रतिसादासाठी “मान्सून कृती आराखडा २०२६” कार्यान्वित
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती, अतिवृष्टी तसेच आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने “मान्सून कृती आराखडा २०२६” तयार केला असून सर्व विभागांना समन्वयाने काम करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांची सुरक्षितता, पूरनियंत्रण, तात्काळ मदत, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात आला आहे.

पूरस्थितीचे L0 ते L4 अशा विविध स्तरांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून त्यानुसार प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यात येणार आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी, धरण विसर्ग आणि संभाव्य पूरस्थितीचा सतत आढावा घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे.

धरण विसर्गावर सतत देखरेख ठेवण्याच्या सूचना
पवना, मुळशी व इतर धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्ग याबाबतची माहिती नियमितपणे घेऊन परिस्थितीनुसार संबंधित विभागांना सतर्क करण्यात येणार आहे. धरण विसर्ग वाढल्यास नदीकाठच्या भागांमध्ये तातडीने सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

क्षेत्रीय कार्यालयांना सतर्कतेच्या सूचना
सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पूरबाधित व सखल भागांची पाहणी करून संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची नोंद करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नदीकाठ, नाले, पाणी साचणारी ठिकाणे आणि पूरप्रवण भागांमध्ये विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नदीकाठ, अतिक्रमणे व धोकादायक बांधकामांवर कारवाई
नदीकाठावरील झोपडपट्ट्या, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तसेच पूरप्रवण भागांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय, धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधितांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.

अग्निशामक विभागाची बचाव यंत्रणा सतर्क
अग्निशामक विभागामार्फत रबर बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, दोरखंड, फ्लड रेस्क्यू साहित्य आणि प्रशिक्षित पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास नदीकाठच्या भागांमध्ये बचाव पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत.

जलद प्रतिसाद पथके (QRT) कार्यरत राहणार
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जलद प्रतिसाद पथके कार्यरत ठेवण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचावकार्य राबविण्यात येणार आहे.

आवश्यकतेनुसार इतर यंत्रणांची मदत घेणार
आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पोलीस, एनडीआरएफ, स्वयंसेवी संस्था तसेच इतर शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार मदत घेण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"