भारत सहकारी बँकिंग परिषदेत प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेचा तिहेरी सन्मान!

लखनौ येथे संपन्न झालेल्या भारत सहकारी बँकिंग परिषद मध्ये गौरव
पिंपरी : लखनौ येथे संपन्न झालेल्या भारत सहकारी बँकिंग परिषद मध्ये प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल तीन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. बँकेला सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक, सर्वोत्कृष्ट चेअरमन आणि सर्वोत्कृष्ट अनुत्पादित कर्ज (एनपीए) व्यवस्थापन या श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात कार्यरत असलेली प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक ही सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य वित्तीय संस्था म्हणून ओळखली जाते. ग्राहककेंद्री सेवा, आधुनिक बँकिंग सुविधा, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभार यामुळे बँकेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कार्याचीच दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील या परिषदेत बँकेचा तिहेरी सन्मान करण्यात आला.
हे पुरस्कार बिस्वजीत फुकन, आसाम राज्याचे आमदार तसेच आसाम सहकारी सर्वोच्च बँक चे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रेरणा बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. यावेळी व्हाइस चेअरमन गबाजी वाकडकर, संचालक सुरेश पारखी, नाना शिवले, राजाराम रंदिल आणि नंदकिशोर तोषणीवाल उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना चेअरमन कांतीलाल गुजर म्हणाले, “हा सन्मान केवळ माझा किंवा संचालक मंडळाचा नसून प्रेरणा बँकेच्या संपूर्ण परिवाराचा आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये संचालक मंडळाचे दूरदर्शी मार्गदर्शन, अधिकारी व कर्मचाऱ्यांची निष्ठा, खातेदारांचा विश्वास, ठेवीदारांचे सहकार्य आणि कर्जदारांची सकारात्मक साथ यांचा मोठा वाटा आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच राष्ट्रीय स्तरावर प्रेरणा बँकेचा गौरव झाला आहे.”
“ग्राहकांना अधिकाधिक आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे, डिजिटल बँकिंगचा विस्तार करणे, आर्थिक शिस्त अधिक मजबूत करणे आणि सहकार क्षेत्रात आदर्श बँक म्हणून प्रेरणा बँकेची ओळख अधिक भक्कम करणे हे आमचे पुढील उद्दिष्ट आहे. आगामी काळातही ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवत प्रगतीचा हा प्रवास अधिक वेगाने सुरू ठेवू.”असे गुजर म्हणाले.
या तिहेरी सन्मानामुळे प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सक्षम नेतृत्वाची, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाची, प्रभावी एनपीए नियंत्रणाची आणि ग्राहकाभिमुख कार्यपद्धतीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आल्याचे अधोरेखित झाले आहे.

