एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाच्या जिन्यात एकाची आत्महत्या!

पिंपरी : चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाच्या जिन्यात एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवार 12 जून रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सिकंदर मोहम्मद शेख (वय 43, येरवडा, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदर शेख यांनी उड्डाणपुलाच्या जिल्ह्यातील लोखंडी अँगलला वायरच्या साह्याने गळफास घेतला. शुक्रवार 12 जून रोजी सकाळी काही नागरिक जिन्यातून जात असताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेख यास तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेख हा विवाहित असून पत्नी त्याच्यापासून विभक्त राहत असल्याची माहिती समोर आली आहे. शेख याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.

