महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही सामूहिक जबाबदारी:सौ विजया रहाटकर

पिंपरी : महिलांची सुरक्षा, सन्मान आणि स्वातंत्र्य ही आपली सामूहिक जबाबदारी असून पोलिसांनी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांसोबत आदरपूर्वक व सौजन्यने वागावे आणि त्यांची तक्रार ऐकून वेळीच योग्य ती कारवाई करावी असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ विजया रहाटकर यांनी केले आहे.

महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी, वेगवान, तंत्रशुद्ध आणि आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महिला आयोग, अतिरिक्त पोलीस महासंचालक, महिला व बालकल्याण अपराध प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलाविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानावर आधारित लिंग संवेदनशील पोलीसिंग आणि प्रभावी तपास या विषयाचे राष्ट्रीय स्तरावरील विशेष कार्यशाळेचे आयोजन सोमवार 27 जुलै रोजी डी. वाय. पाटील कॉलेज येथे करण्यात आले होते. यावेळी सौ रहाटकर बोलत होत्या.
कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष सौ विजया रहाटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सौ स्वाती चव्हाण (माजी प्रधान न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय मुंबई), सौ नंदिनी आवडे (सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग), अश्वती दोरजे (अप्पर पोलीस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य) ब्रिजेस सिंह (विशेष पोलीस महानिरीक्षक तथा माहिती व जनसंपर्क महासंचालक, महाराष्ट्र राज्य) ,सौ शारदा राऊत (विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग), डॉ. शशिकांत महावरकर (सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड), संजय दराडे (सह पोलीस आयुक्त पुणे शहर), रंजन कुमार शर्मा (विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र), सारंग आवाड (अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), संदीप गिल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण ), रामावतार सिंह (उपसंचालक राष्ट्रीय महिला आयोग )यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक प्रकरणाचा तपास अत्याधुनिक तंत्रज्ञान, संवेदनशीलता आणि व्यावसायिकतेच्या आधारे करण्याचे आवाहन केले. अशा प्रशिक्षण उपक्रमामुळे महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा तपासाची गुणवत्ता अधिक उंचावून पिडीतांना जलद व प्रभावी न्याय मिळवून देण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या कार्यशाळेस पिंपरी चिंचवड, पुणे शहर, सोलापूर शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर ग्रामीण येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी व तपास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

