Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड शहरासाठी हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट आणि ई-आरटीएस प्रकल्पाला गती!

पिंपरी चिंचवड शहरासाठी हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट आणि ई-आरटीएस प्रकल्पाला गती!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक संपन्न
प्रायोगिक प्रकल्पाच्या तातडीने अंमलबजावणीच्या सूचना
पिंपरी : पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती द्यावी. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व नियोजनासंदर्भातील सर्व कार्यवाही तातडीने सुरू करून प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करावा आणि नागरिकांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

viara vcc
viara vcc

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या, वेगाने वाढणारे शहरीकरण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रवाशाभिमुख करण्याच्या दृष्टीने एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि वर्तुळाकार मार्ग विकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २७ जुलै २०२६ रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त अभिजित चौधरी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अति पोलीस आयुक्त मनोज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या संकल्पनेची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. ही प्रणाली मेट्रोप्रमाणेच वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी असून रबर टायरवर धावणाऱ्या पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांवर आधारित असेल. एका वाहनामध्ये सुमारे २४० हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील, अशी क्षमता या प्रणालीमध्ये असेल, असेही ते यावेळी म्हणाले. 

या प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून सुमारे १७ किलोमीटर लांबीचा प्रायोगिक मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या मार्गामध्ये गोडाऊन चौक – कुदळवाडी चौक – ऑटो क्लस्टर – काळेवाडी फाटा – जगताप डेअरी चौक – वाकड या प्रमुख भागांचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकल्प महामेट्रोच्या सहकार्याने सुमारे एक ते दीड वर्षांच्या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्याचे नियोजन बैठकीत मांडण्यात आले.

प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर एचसीएमटीआर व शहरातील सर्व बीआरटी मार्गांवर ई-आरटीएस प्रणालीचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी प्रभावी व सुलभ जोडणी निर्माण करून नागरिकांना अखंड, जलद आणि प्रवाशाभिमुख प्रवासाचा अनुभव देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे सादरीकरणात स्पष्ट करण्यात आले.

या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषणात घट होण्यास, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास तसेच नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.

सादरीकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संकल्पनेचे स्वागत करून प्रकल्पास मान्यता दर्शविली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ई-आरटीएस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने सुरू करावी, तसेच प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"