फक्त मुद्द्याचं!

11th June 2026
पिंपरी-चिंचवड

शहराच्या विकासात उद्योगांचे सामाजिक दायित्व निधीची भूमिका महत्वाची : महापौर लांडगे

शहराच्या विकासात उद्योगांचे सामाजिक दायित्व निधीची भूमिका महत्वाची : महापौर लांडगे

शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तथा उद्योग समूहांसोबत संवाद बैठक संपन्न
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराची देशपातळीवरील वेगळी ओळख ही येथील उत्कृष्ट पायाभूत सुविधांमुळे निर्माण झाली आहे. शहराच्या विकासात आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. शहरातील विविध उद्योग समूहांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून महापालिकेला दिलेल्या सहकार्यामुळे अनेक लोकाभिमुख उपक्रम आणि विकासकामे यशस्वीपणे राबविता आली आहेत. यापुढेही हे सहकार्य कायम ठेऊन उद्योगसमुहांनी शहराच्या विकासात उस्फूर्तपणे हातभार लावावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सी.एस.आर. कक्ष अंतर्गत शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या तथा उद्योग समूह यांच्याद्वारे प्राप्त होणारा सी. एस. आर. निधी मिळविणे तसेच त्याचा योग्य वापर करून शहराच्या शाश्वत विकासात हातभार लावणे या उद्देशाने मोरवाडी येथील दिव्यांग भावन फाऊंडेशन येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मनोगत व्यक्त करताना महापौर रवि लांडगे बोलत होते.

या बैठकीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सह आयुक्त मनोज लोणकर, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, प्रफुल्ल पुराणिक,राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक वारे गुरूजी, सीएसआर कक्षाचे विजय वावरे, श्रुतिका मुंगी यांच्यासह अल्फा लावल, एल्केजेन, एरॅमॉन्ड, ऍटलास कॉप्को, ऍटकॉम लिमिटेड, बजाज फायनान्स, बिसलेरी, बीएमसी सॉफ्टवेअर, ब्रिजस्टोन, सीआयई इंडिया, डीएएनए लिमिटेड, डेलोरोटो इंडिया, डायम डिस्प्ले, डी-मार्ट, फिआट, कावासाकी मोटर्स, पदमजी, सॅडविक कोरोमंट, एसकेएफ इंडिया, टाटा मोटर्स, थरमॅक्स, टीकेआयएल, डब्ल्यूटीई इन्फ्रा, यझाकी, ऍडियंट लिमिटेड, बजाज ऑटो, बॉश, गरवारे, हुडको आदी कंपन्यांचे सीएसआर प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड हे औद्योगिकदृष्ट्या देशातील अग्रगण्य शहर असून येथील कंपन्या सामाजिक उत्तरदायित्व जपण्यामध्येही तितक्याच पुढे आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी एकत्रितपणे काम करणे ही काळाची गरज असून, पिंपरी चिंचवडमधील उद्योग समूहांनी याचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. सीएसआर निधीच्या उपलब्धतेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड शहरात मोठी क्षमता असून, अशा प्रकारचे सीएसआर पोटेन्शियल देशातील फार कमी शहरांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे उद्योग समूहांनी शहराच्या सामाजिक विकासामध्ये अधिक सक्रिय सहभाग नोंदवावा.

महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे उभारण्यात आलेले दिव्यांग भवन फाऊंडेशन हे देशातील एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण केंद्र असून ते इतर महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे., उद्योग क्षेत्राच्या सहभागामुळे दिव्यांग बांधवांसाठी आधुनिक सुविधा, अत्याधुनिक उपचार व्यवस्था आणि विविध कल्याणकारी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होईल. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सोयीसुविधा पोहोचविण्यासाठी महापालिका आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील हे सहकार्य अधिक दृढ व्हावे, अशी अपेक्षाही महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केली.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील विविध उद्योग समूह सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सीएसआर निधीच्या माध्यमातून शहराच्या विकासात सक्रिय योगदान देत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सेवा, सामाजिक विकास तसेच विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये सीएसआर निधीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प आणि उपक्रम राबविण्यात आले आहेत. दिव्यांग भवन फाऊंडेशन हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद उपक्रम असून दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी हे केंद्र प्रभावीपणे कार्यरत आहे. दिव्यांग बांधवांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उद्योग क्षेत्राचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, शहरातील जास्तीत जास्त कंपन्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील यावेळी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी केले.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले, समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या सीएसआर उपक्रमाचे भागीदार होण्याची संधी मिळणे ही प्रत्येकासाठी अभिमानाची आणि भाग्याची बाब आहे. ज्या शहराने आपल्याला ओळख, संधी आणि प्रगतीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्या शहराच्या विकासासाठी आपणही आपले योगदान देणे ही सामाजिक जबाबदारी आहे.या दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या कार्याचा आणि पिंपरी चिंचवड शहराच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचा गौरव राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी उद्योग समूहांनी सीएसआर निधीच्या माध्यमातून अधिकाधिक सहकार्य करावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय वावरे यांनी केले. तर आभार मनोज लोणकर यांनी मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"