मावळ व खेड तालुक्यात पाच ठिकाणी हातभट्टीवर छापे

मुद्देमाल जप्त; सर्व गुन्हेगार पसार
पिंपरी : पुणे, हडपसर, फुगेवाडी येथे विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील पाच ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले. मुद्देमाल जप्त केला, मात्र एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही.

शिरगाव तालुका मावळ येथे हातभट्टी दारूवर पोलिसांनी छापा टाकला हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे एक लाख 40 हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन भिजत घातले होते. पोलीस आल्याची चाहूल लागल्याने महिला आरोपी तेथून पळून गेली.
शिरगाव हद्दीतच पवना नदीच्या कडेला जमिनीमध्ये खड्डा खोदून गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता लागणारे गुळ मिश्रित कच्चे रसायन हजार लिटर सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचे भिजत घालत असताना पोलिसांनी छापा टाकला.मात्र पोलिसांची चाहूल लागताच महिला आरोपी तेथून पळून गेली.
शिरगाव पोलीस ठाणे हद्दीत ओझर्डे गावामध्ये पवना नदीकाठी हातभट्टी साठी लागणारे गुळमिश्रित तीन लाख 85 हजार रुपये किंमतीचे कच्चे रसायन भिजत घालत असताना पोलिसांनी छापा टाकला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच महिला आरोपी जागेवरून पळून गेली.
चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुळ गावच्या पठारे वस्ती, ता. खेड येथे तीन पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये 800 लिटर सुमारे 40 हजार रुपये किंमतीचे उग्र वासाचे गावठी दारू तयार करण्याचे रसायन भिजत घातले होते. पंचा समक्ष हे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले. हे रसायन एका महिलेच्या मालकीच्या असल्याचे चौकशीत समजले मात्र आरोपी अटक नाही.
दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगर वस्ती, निघोजे ता. खेड येथे पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना दहा हजार रुपये किंमतीची हातभट्टी दारू ही बेकायदेशीर रित्या विक्रीकरिता जवळ बाळगल्याने नितीन धोंडीबा गायकवाड (वय 53, रा. जयभीम वस्ती, मौजे निघोजे) यांना बी एन एस कलम (35 /3) नुसार नोटीस दिली आहे असे पोलिसांनी सांगितले.

