विषारी दारू प्रकरणात निष्काळजीपणा; दापोडी पोलीस ठाण्याचे सहा कर्मचारी निलंबित!

पिंपरी : फुगेवाडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि फौजदारासह चार कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी निलंबित केले आहे .

पोलीस आयुक्तांनी निलंबित केलेल्या मध्ये दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, तपास पथकाचे गुन्हे प्रमुख फौजदार राजू भास्कर आणि कर्मचारी जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे ,सागर जाधव, विशाल काळे यांचे निलंबन करण्यात आले आहे .मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम 1956 आणि मुंबई पोलीस अधिनियम 1951अंतर्गत अधिकाऱ्यांचा वापर करत तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. निलंबित केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची व पोलीस कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत ही कारवाई लागू राहणार आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपींनी स्पिरिट सारखे रसायन वापरून दारू तयार केली होती .35 लिटरच्या 12 ड्रम मध्ये भरून ठेवली .त्यापैकी एक ड्रम फुगेवाडी येथील करणसिंग आणि गुरुमतसिंग यांच्याकडे पाठवण्यात आला होता. या दारूची ते स्थानिक ग्राहकांना विक्री करीत होते. मृत व्यक्तींनी त्यांच्याकडून ही दारू घेऊन प्राशन केली. त्यांना रात्री चक्कर येणे, दम लागणे, श्वसनाचा त्रास, अंधारी अशी लक्षणे दिसू लागली. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी मात्र ही जबाबदारी पोलिसांवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. या दारू धंद्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या मात्र पोलिसांनी आर्थिक कारणामुळे कायमच दुर्लक्ष केले. गावठी हातभट्टी दारू पिल्यामुळे गेल्या एक ते दीड वर्षात फुगेवाडी आणि दापोडी भागात 100 ते 150 व्यक्ती दगावले आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
हातभट्यांवर छापे मारले मात्र आरोपी गायब
मावळ आणि खेड तालुक्यात अशाच प्रकारे हातभट्टी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. पोलिसांनी या हातभट्यांवर छापे मारले मात्र भट्ट्या चालविणाऱ्यांना अटक केली नाही. फक्त मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे ही कारवाई दाखवण्यासाठी होती अशी चर्चा सध्या सुरू आहे. शिरगाव ,खेड या भागात असेच प्रकार सुरू आहेत. पोलीस आयुक्तांनी अशा प्रकारचे अवैध धंदे रोखण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याला जबाबदार धरून कारवाई केली पाहिजे. अन्यथा विषारी दारूमुळे जीव गेल्यामुळे तात्पुरती कारवाई होते पुढे धंदे चालूच असतात ही शोकांतिका आहे.
Page

