किरकोळ भांडणाचा राग मनात धरून खून!

आळंदी : किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीच्या डोक्यात हातोडीने वार करून खून केला. ही घटना गुरुवार दोन जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घोलप वस्ती, काकडे सिटी, चर्होली खुर्द, ता. खेड येथे घडली. करवीरसिंग नथूसिंग लोधी (रा. छापरी ठाकूर, भिलाई प्रदेश, दमोह ,मध्य प्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी चंद्रकांत पंढरीनाथ भाळे (वय 43, रा. गल्ली नंबर एक, एम आय टी कॉलेजच्या शेजारी, देहू फाटा) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. साहिल रामदास दाभाडे (वय 29, रा. घोलप वस्ती, काकडे सिटी, चर्होली खुर्द, ता. खेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने किरकोळ भांडणाचा राग मनात धरून करवीरसिंग नथूसिंग लोधी (रा.छापरी ठाकूर, बिलाई प्रदेश, मध्य प्रदेश) यांच्या डोक्यामध्ये हातोडीने वार करून जीवे ठार मारले. आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ हे तपास करत आहेत.

कामगाराने केली दोन लाखाच्या कॉपर कॉईलची चोरी!
पिंपरी : खेड तालुक्यातील वासुली येथील जीई एरोस्पेस कंपनीतून दोन लाख रुपये किंमतीच्या 20 कॉपर कॉइल चोरी केल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही चोरी 21 मे आणि 31 मे रोजी उघडकीस आली.
चंद्रशेखरराव सत्यनारायण सामासानी (वय 36 रा. मोशी, मूळ- आंध्र प्रदेश) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अब्दुल अहमद अन्सारी (वय 32, आकुर्डी, मूळ- हजारीबाग, झारखंड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीतील वेगवेगळ्या वजनाच्या एकूण 20 कॉपर कॉइल चोरी केल्या. चोरी केलेल्या कॉपर कॉइलची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

