मान्सूनच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांबाबत सतर्क राहण्याचे महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन!

झाडांच्या फांद्या, धोकादायक वृक्ष व आपत्कालीन परिस्थितीसाठी क्षेत्रनिहाय संपर्क क्रमांक जाहीर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, वादळी वारे तसेच वीजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अशा वातावरणात झाडे उन्मळून पडणे किंवा फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मान्सूनपूर्व करण्यात आलेल्या उपाययोजनांनंतरही अतिवृष्टी, वादळी वारे अथवा विजांच्या प्रभावामुळे काही ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या वाहनांचे पार्किंग झाडाखाली करू नये तसेच वादळी वातावरणात झाडाखाली थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या परिसरात एखादे झाड धोकादायक स्थितीत असल्याचे किंवा झाडाच्या फांद्या पडण्याचा धोका असल्याचे आढळल्यास त्याची तात्काळ माहिती महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागास द्यावी. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वीजवाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत असल्यास किंवा धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याबाबतही संबंधित विभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून तातडीने आवश्यक कार्यवाही करता येईल.
झाडांच्या फांद्या छाटणीसाठी परवानगी, धोकादायक वृक्षांबाबत तक्रार अथवा झाड पडल्यास नागरिकांनी आपल्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकारी अथवा सुपरवायझरशी संपर्क साधावा. यासाठी महानगरपालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी त्याचा उपयोग करावा, असे आवाहन उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाने केले आहे.
याशिवाय आवश्यकतेनुसार मुख्य उद्यान अधीक्षक, उद्यान अधीक्षक तसेच वृक्ष अधिकाऱ्यांशीही संपर्क साधता येणार असून मान्सून काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेचे उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग सतत सज्ज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
धोकादायक झाडे, फांद्या किंवा वृक्षांबाबत तक्रारींसाठी क्षेत्रनिहाय संपर्क क्रमांक
अ क्षेत्रीय कार्यालय – श्री. दुदूसकर सुनील सुदाम (अति. हॉर्टी सुपरवायझर) – ९८९०८९८६६३
ब क्षेत्रीय कार्यालय – श्री. प्रतीप भिमराव गजरमल (उद्यान सहाय्यक) – ९९२२३७३४६२
क क्षेत्रीय कार्यालय– श्री. प्रमोद तात्याबा दवणे (हॉर्टी सुपरवायझर) – ८३९०५०६००२
इ क्षेत्रीय कार्यालय – श्री. सचिन विठ्ठल शिणगारे (उद्यान सहाय्यक) – ९६२३५५५०००
फ क्षेत्रीय कार्यालय – श्री. प्रथमेश प्रमानंद सिनकर (हॉर्टी सुपरवायझर) – ९९२०१५४८३७
ग क्षेत्रीय कार्यालय – श्री. सिद्धेश्वर कडाळे (उद्यान सहाय्यक) – ९५९५३९३३२३
ज क्षेत्रीय कार्यालय – श्री. प्रशांत विकास ताकवले (उद्यान निरीक्षक) – ८०१३१५६७१८
ल क्षेत्रीय कार्यालय – श्री. सामसे सुहास एकनाथ (उद्यान सहाय्यक) – ९९२२९६५९६६
ह क्षेत्रीय कार्यालय– श्री. सुरेश गोविंद घोडे (सहा उद्यान निरीक्षक) – ९५२७७७५१०६
याशिवाय समन्वयासाठी उद्यान अधीक्षक श्री. योगेश वाळूंज (८८२८६१८०३०) तसेच सहाय्यक उद्यान अधीक्षक श्री. राजेश वसावे (९९२२५०११०४) यांच्याशीही संपर्क साधता येईल, असे महापालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाने कळविले आहे.

