मोशी कचरा डेपो दुर्घटना; चौकशी समितीने प्रत्यक्ष जागेवर भेट दिल्याने महापालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले!

पिंपरी : मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीने महापालिकेकडे 35 मुद्द्यांची माहिती मागितल्याने महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पची प्रशासकीय इमारत कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने शुक्रवार 17 जुलै रोजी कचरा डेपोस भेट दिली. त्यानंतर चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे समितीची बैठक झाली. चौकशी समितीचे अध्यक्ष पुणे विभागीय आयुक्त शितल तेली- उगले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, मुंबईतील आयआयटी चे प्राध्यापक डी.एन.सिंग, पर्यावरण व घनकचरा विषयातील तज्ञ अनिल कुमार दीक्षित, समिती सचिव सदस्य महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे तसेच महापालिकेचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. बैठकीपूर्वी समितीने कचरा डेपो वेस्ट टू एनर्जी प्रकल्प दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहणी केली. त्यानंतर बैठक घेण्यात आली.
मोशी कचरा डेपो वेस्ट टू एनर्जी बायोमायनिंग आदी व इतर कामाबाबत सुमारे 35 मुद्द्याबाबतची कागदपत्रे त्यांनी मागितली आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून कागदपत्रांची जुळवाजवळ करण्यात येत आहे. चौकशी समितीने दुर्घटना स्थळाला भेट देऊन पाहणी केल्याने महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी बांधकाम परवानगी व अन्य विभागातील अधिकाऱ्यांचे यामुळे धाबे दणाणले आहेत. वेस्ट एनर्जी प्रकल्पासाठी बांधलेल्या इमारतीला बांधकाम विभागाने एक मजल्यासाठी परवानगी दिली असताना त्यावर बेकायदेशीररित्या दोन मजले बांधण्यात आले. या इमारतीपासून कचऱ्याची साठवणूक असलेल्या ठिकाणच्या अंतरामध्ये मोठी तफावत आहे. कचऱ्याचे डोंगर प्रमाणापेक्षा जादा प्रमाणात उभे करण्यात आले आहेत. याची देखील माहिती समितीने घेतली आहे. महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचे वाभाडे या चौकशीमुळे उघड होणार आहेत.
पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यांच्या एकूणच सर्व कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची तपासणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रत्येक दोन तासाला करणे आवश्यक असते .त्याची वेळेप्रमाणे नोंद आवश्यक आहे. मात्र ज्या ठेकेदाराला हे काम दिले आहे ती कंपनी हे काम व्यवस्थितपणे करत नसल्याच्या तक्रारी असल्याने नागरिकांना विषारी पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण वाढले आहे. याची दखल देखील महापालिका प्रशासन आणि चौकशी समितीला घ्यावी लागेल अशी चर्चा महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

