मोशी कचरा डेपो दुर्घटना; मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांना कंपनीकडून मिळणार ४० लाखांची मदत!

मृत कर्मचा-यांच्या मुलांचे शिक्षण, वैद्यकीय विमा आणि कुटुंबातील एकाला नोकरी ; सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे
पिंपरी : मोशी कचरा डेपो दुर्घनेत मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ऍन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनीच्या वतीने एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य करण्यात आले आहे. याशिवाय कुटुंबीयांचा वैद्यकीय विमा, त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचेही कंपनीने मान्य केले आहे. सध्या महापालिकेच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपये आणि कंपनीच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपये, अशी २० लाख रुपयांची मदत कुटुंबीयांना मिळाली आहे अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ९ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना महापालिका प्रशासन, ऍन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनी तसेच शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्या, त्यांना आतापर्यंत मिळालेली मदत आणि भविष्यातील आवश्यक मदतीबाबत सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
या पत्रकार परिषदेस स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, प्रभाग अध्यक्ष निखील बोऱ्हाडे, नगरसदस्य सचिन तापकीर, नगरसदस्या सारिका गायकवाड, रविंद्र गायकवाड,सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय,ऍन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. यापैकी दोन मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे अद्याप ही मदत मिळालेली नाही. संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून त्यांनाही लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशांत शितोळे यांनी दिली.
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत मिळावी यासाठी महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे तसेच सर्व लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसमवेत बैठक घेऊन त्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेण्यात आल्या. कुटुंबीयांच्या मागण्यांवर चर्चा करून त्यांच्या सहमतीने प्रत्येक मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे ऍन्टोनी लारा रिन्युएबल्स कंपनीच्या वतीने मान्य करण्यात आले असल्याची माहिती सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिली.
मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय विमा, त्यांच्या मुलांच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी तसेच प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचेही कंपनीने मान्य केले आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मागणीनुसार महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध करून देणे तसेच घरकुल योजनेच्या माध्यमातून निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या वतीनेही मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यात त्यांच्या ज्या काही गरजा असतील, त्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचप्रमाणे, कंपनीच्या वतीनेही मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे,” असेही सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

