चिंचवड मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी’ कक्षाची स्थापना

थेरगाव: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी २०५ चिंचवड मतदारसंघाच्या थेरगाव येथील निवडणूक कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.
या कक्षामार्फत निवडणूक प्रचारासंबंधी वाहन परवाने, प्रचार सभा, कोपरा सभा परवानगी, तात्पुरत्या पक्ष कार्यालयासाठीची परवानगी, रॅली, मिरवणूक, रोड- शो, पदयात्रा यासंबंधीच्या परवानग्या तसेच स्टेज, बॅरीकेटस्, व्यासपीठासाठीच्या परवानग्या आदी संबंधित अर्जांचे विहित नमुने व आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहिती उमेदवारांना पुरविण्यात येणार आहे.
एक खिडकी कक्षातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग क्षेत्रीय कार्यालय, तळ मजला, थेरगाव याठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन अनिल पवार यांनी सांगितले आहे.