फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

चिंचवडच्या मतदार संघावरुन महायुतीत तीव्र मतभेद

चिंचवडच्या मतदार संघावरुन महायुतीत तीव्र मतभेद

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावा अशी आमची आग्रही मागणी आहे. जागा न सुटल्यास आमच्यासमोर महाविकास आघाडीचा पर्याय खुला असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी दिला आहे. तसेच मागील चार निवडणुकीत पराभूत झालेल्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली.

माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. प्रशांत शितोळे म्हणाले, की शहराच्या जडणघडणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. त्यातून मार्ग काढून चिंचवडची जागा आम्हाला मिळाली पाहिजे. अन्यथा महाविकास आघाडीचा आमच्यासमोर पर्याय आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आम्ही चांगला उमेदवार देणार आहोत. पोटनिवडणुकीनंतर चिंचवडमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आणखी २० माजी नगरसेवक सोबत आहेत. मागील चार निवडणुका लढलेल्या त्याच त्या चेहऱ्यांना अपयश येत असेल तर चेहरा बदलला पाहिजे.

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आम्ही २० माजी नगरसेवक एकत्र आलो आहोत. आमची दिशा ठरली असून त्यानुसार पुढे जाणार आहोत. पर्याय भरपूर आहेत. अजित पवार गटाला उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी आहे. भाजपमध्ये मोठी धुसफूस आहे. जागेसाठी आग्रही आहोत. जागा नाही मिळाली तर सर्व पर्याय खुले आहेत. अजित पवार यांनी मनधरणी केली तरी थांबणार नाही. महायुतीतून बाहेर पडणार आहोत. शहराध्यक्षही निवडला जात नाही. अशा सर्व गोष्टींविरोधात बंड केले जात असल्याचे माजी नगरसेवक कलाटे यांनी सांगितले. तर, अजित पवारांची साथ सोडणार नाही. पण, भाजपचे काम करणार नाही. भाजपचे दहा ते बारा नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा माजी नगरसेवक भोंडवे यांनी केला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"