पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला प्रारंभ!

अचूक व पारदर्शक मतदार याद्यांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन
पिंपरी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. या मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरभेटी देऊन गणनापत्रकांचे वितरण करणे आणि भरलेली गणनापत्रके स्वीकारण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा सुरू झाला आहे. मतदार याद्यांची अचूकता, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा विशेष कार्यक्रम राबवला जात असून, या मोहिमेचे तारखेनिहाय प्रमुख टप्पे जाहीर करण्यात आले आहेत.

यानुसार ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत BLO घरोघरी जाऊन ‘Enumeration Form’ भरून घेणार आहेत, तर २९ जुलैपूर्वी मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण केले जाईल. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या काळात दावे व हरकती स्वीकारल्या जातील. या प्राप्त दावे-हरकतींवर ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान सुनावणी घेऊन अखेर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम शहरात सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे कार्यालयामार्फत विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या मदत कक्षांतर्गत शहरातील २०५-चिंचवड, २०६-पिंपरी आणि २०७-भोसरी या विधानसभा मतदारसंघांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवडणूक विभाग उपआयुक्त सचिन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सुरू असलेल्या या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदवणे, दुरुस्ती करणे अथवा यादी अधिक अचूक करणे या राष्ट्रीय कामात सुजाण नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य ती माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी विक्रांत बगाडे यांनी केले आहे.

