आषाढी पालखी सोहळ्यातील भाविकांना अखंड आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय विभाग सज्ज!

प्रमुख पालखी मार्गांवर ७ वैद्यकीय पथके, ७३ अधिकारी-कर्मचारी, २४ तास रुग्णवाहिका व आरोग्यसेवेची व्यापक व्यवस्था
पिंपरी, : आषाढी पालखी सोहळा २०२६ निमित्त लाखो वारकरी पिंपरी-चिंचवड शहरातून मार्गक्रमण करणार असून त्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने व्यापक नियोजन केले आहे. वारकऱ्यांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी सात वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, प्रथमोपचार किट, कार्डियाक रुग्णवाहिका तसेच स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यावर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत एकूण ७ वैद्यकीय पथके कार्यरत राहणार असून त्यामध्ये ७३ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एम.पी.डब्ल्यू., वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका चालक तसेच आशा स्वयंसेविका यांचा समावेश आहे. तसेच पालखी सोहळ्याचे कामकाज सुरळीत व समन्वयाने पार पाडण्यासाठी प्रत्येक रुग्णालय स्तरावर झोनल अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वारकऱ्यांच्या मूलभूत सुविधांचाही विचार करून पालखी मार्गावर १,९२५ शौचालये आणि ६२५ स्नानगृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच दिंडी प्रमुखांना आवश्यक उपचार तातडीने करता यावेत यासाठी १,५०० प्रथमोपचार किटचे वितरण करण्यात येणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील व्यवस्था
दि. ८ जुलै २०२६ रोजी निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प येथे रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. या पालखी मार्गावर एकूण ६ वैद्यकीय पथकांमध्ये ५१ अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर पालखी मुक्कामस्थळी २४ तास वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहे. तसेच कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल, आकुर्डी येथे पार्किंग परिसरात २४ तास बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू ठेवण्यात येणार आहे. याशिवाय खंडोबामाळ, आकुर्डी येथे आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या सहकार्याने कार्डियाक रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
दि. ९ जुलै २०२६ रोजी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होत असताना चिंचवड स्टेशन येथे तालेरा रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे जिजामाता रुग्णालय, वल्लभनगर येथे सांगवी रुग्णालय, नाशिक फाटा येथे वायसीएम रुग्णालय आणि सीएमई, दापोडी येथे थेरगाव रुग्णालयामार्फत वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील व्यवस्था
दि. ९ जुलै २०२६ रोजी वडमुखवाडी येथील साई मंदिर येथे नवीन भोसरी रुग्णालयामार्फत वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मॅगझीन चौक, दिघी येथील स्वागत कक्षात नवीन भोसरी रुग्णालयामार्फत वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका तैनात करण्यात आली असून येथे २२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय केएलई मेडिकव्हर रुग्णालय, भोसरी यांच्या सहकार्याने कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पालखी मार्गावर दिघी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, दिघी यांच्याकडूनही रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.
“महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये २४ तास वैद्यकीय सेवा, प्रशिक्षित वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, आवश्यक औषधसाठा आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा तसेच पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित आणि प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय विभाग पूर्णपणे सज्ज आहे.” – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

