पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले!

चिखली म्हेत्रे वस्ती परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडी जखमी
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून चिखली मधील म्हेत्रे वस्ती परिसरात चार वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चार वर्षे चिमुकली रविवारी घरासमोरील मोकळ्या जागेत खेळण्यासाठी गेली होती. यावेळी दोन भटक्या कुत्र्यांनी अचानक तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर आणखी दोन मोकाट कुत्रे तिथे आले. कुत्र्यांनी घेरल्यामुळे मुलगी जीव वाचवण्यासाठी धावू लागली. चिमुरडीच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. नागरिकांनी प्रसंग वादन राखत कुत्र्यांना पळवून लावल्याने मोठे दुर्घटना टळली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीला तात्काळ महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांना आवर घालण्याचा प्रश्न मागील विधानसभा अधिवेशनात चर्चेला आला होता. त्यावेळी महापालिकेकडून यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक निर्माण केले होते. परंतु गेल्या काही दिवसापासून हे पथक निष्क्रिय झाले आहे .त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही भटके कुत्रे दुचाकी वाहन चालकांवर सुद्धा हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते. महापालिकेचे विशेष पथक कोणत्या परिसरात काम करते याची माहिती कधीच उघड होत नाही. या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे यश साने यांनी केली आहे.

