फक्त मुद्द्याचं!

2nd June 2026
पिंपरी-चिंचवड

नालेसफाई, अतिक्रमण, स्वच्छतागृहे, वृक्षारोपणसह विविध विभागांचा आयुक्तांनी घेतला आढावा!

नालेसफाई, अतिक्रमण, स्वच्छतागृहे, वृक्षारोपणसह विविध विभागांचा आयुक्तांनी घेतला आढावा!

पिंपरी : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले, रस्ते, सार्वजनिक सुविधा, स्वच्छता व्यवस्था यांसह अतिक्रमण निर्मूलन, हॉकर्स व्यवस्थापन, स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण, वृक्षारोपण, पालखी सोहळ्याची तयारी आणि अग्निसुरक्षा यासह विविध विषयांबाबत आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात बैठक घेतली.

viara vcc
viara vcc

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, अजय सुर्यवंशी, मनोज सेठिया, उप आयुक्त सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल, संदीप खोत, सीताराम बहुरे, राजेश आगळे, व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, अमित पंडीत, तानाजी नरळे, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पुजा दुधनाळे आदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शहरातील नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहील याची खात्री करावी. ज्या ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत तेथील नाल्यांची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांची गुणवत्ता आणि परिणामकारकता तपासावी. नाल्यांची रुंदी, खोली आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता या बाबींचा देखील विचार करावा आणि अहवाल सादर करावा. तसेच शहरात अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी सातत्याने निरीक्षण ठेवावे. फुटपाथ, मोकळ्या जागा तसेच महापालिकेच्या मालकीच्या इतर जागांवर होणाऱ्या अतिक्रमणांवर नियमित कारवाई करा. तसेच शहरातील फेरीवाल्यांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय हॉकर्स झोन निश्चित करून त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या. यामुळे सार्वजनिक रस्ते, चौक आणि फुटपाथवरील अतिक्रमण कमी होऊन वाहतूक व्यवस्थेला मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो अशा ठिकाणांची ओळख पटवून तेथे सुशोभीकरण, हरितीकरण किंवा वृक्षारोपण करण्याचे निर्देश देण्यात आले. अशा उपाययोजनांमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण कमी होईल, असे ते म्हणाले. याचबरोबर शहरातील अनधिकृत फ्लेक्स, बेकायदेशीर जाहिरात फलक आणि परवानगीविना उभारण्यात आलेल्या जाहिरातींवर सातत्याने लक्ष ठेवून नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

महापालिकेच्या वतीने शहरासाठी स्वतंत्र ‘टॉयलेट पॉलिसी’ तयार करण्यात येत असून त्यासाठी शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण अचूक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. जी स्वच्छतागृहे जीर्णावस्थेत आहेत किंवा नागरिकांच्या गरजांनुसार अपुरी ठरत आहेत, त्याठिकाणी आधुनिक सुविधा असलेली स्वच्छतागृहे उभारण्यावर भर देण्यात यावा. तसेच महिलांसाठी बसविण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन्स कार्यरत असल्याची नियमित खातरजमा करावी. तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये आकर्षक आणि पर्यावरणपूरक वृक्ष लागवड करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबविण्यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

येत्या पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी साचण्याची किंवा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा संवेदनशील भागांमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आणि कार्यान्वित असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असणे आवश्यक असल्याचे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"