भाजप प्रणित विक्रम काकडे यांना आयत्यावेळी उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी!

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक
पिंपरी : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप प्रणित विक्रम काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीतून उमेदवारी दिल्याने पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस मधील इच्छुक नाराज आहेत. नेहमीप्रमाणे पिंपरी चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांना खेळवण्याचे काम वरिष्ठांनी केले असल्याची भावना निर्माण झाली आहे.

आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहराला न्याय मिळाला नाही. यावेळेस मात्र हा न्याय मिळेल अशा अपेक्षा होत्या. त्या देखील फोल ठरल्या आहेत. त्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले आहे. भाजपच्या माजी खासदार मुलाला उमेदवारी कशी दिली जाते याबाबत राष्ट्रवादीतील दिलीप वळसे पाटील, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे,आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार अतुल बेनके यांनी विरोध दर्शवला होतो. याच मतदार संघातून यापूर्वी अ्निल भोसले यांना दोन वेळा आमदारकी मिळाली असून आता त्यांचे जावई विक्रम काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने संधी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती
आयत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती संजय काकडे यांनी आपल्या मुलासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आम्ही निष्ठावंतांनी फक्त प्रचारच करायचा का? अशा भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. विक्रम काकडे यांना पुणे स्थानिक स्वराज्य मतदार संघातून उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच वजन टाकले असल्याची चर्चा सध्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात सुरू आहे. भाजपने विक्रम काकडे यांना उमेदवारी देऊन अप्रत्यक्षरीत्या भाजपचे नियंत्रण पुणे जिल्ह्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे .त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोर्चेबांधनी केली होती त्यांचा या जागेसाठी आग्रह होता. परंतु उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आग्रहाखातर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अखेरच्या क्षणी देण्याचे मान्य केले. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या देखील मोठी होती. माजी आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार सुनील टिंगरे, माजी जिल्हा अध्यक्ष सुरेश घुले, माजी आमदार विलास लांडे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची भेट घेऊन मोर्चे बांधणी देखील केली होती.

