आमदार महेश लांडगे यांना यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ जाहीर!

२४ मे रोजी निगडीतील ग.दि.मा. नाट्यगृहात वितरण
पिंपरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ भोसरी विधानसभेचे आमदार आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते महेश लांडगे यांना जाहीर करण्यात आला आहे.

ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, रविवार दिनांक २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता निगडी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती संयोजक राजन लोणकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे दरवर्षी पिंपरी-चिंचवड शहरात सावरकर जयंतीनिमित्त जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या कार्यक्रमात ‘सावरकर समजून घेताना’ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर माजी सनदी अधिकारी तथा ‘चाणक्य मंडळ परिवाराचे’ प्रमुख, ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांचे मुख्य मार्गदर्शन लाभणार आहे.
पुरस्काराची घोषणा करताना संयोजकांनी सांगितले की, आमदार महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात एक आक्रमक हिंदुत्ववादी वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे धर्मजागरण, गोरक्षा आणि सामाजिक ऐक्याच्या विविध विषयांवरील दौरे आता संपूर्ण राज्यभर सुरू आहेत. विविध हिंदू संमेलनांच्या माध्यमातून ते सातत्याने समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत.

