टाळगाव चिखलीतील टाऊन हॉलला ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज’ यांचे नाव!

पिंपरी-चिंचवड महापालिका महासभेत उपसूचनेस मंजुरी
पिंपरी : टाळगाव चिखली येथील टाऊन हॉलला “जगद्गुरू संत तुकाराम महाराज टाऊन हॉल” असे नामकरण करण्याच्या उपसूचनेस पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक वारशाला सन्मान मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महापौर रवि लांडगे यांनी या उपसूचनेला मंजुरी दिली आहे.

भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून टाळगाव चिखली येथील टाऊन हॉल उभारण्यात आला आहे. टाळगाव चिखली हे गाव संत परंपरेशी निगडित असून, या परिसरास जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीतील समता, मानवता आणि भक्तीभावाचा प्रभाव आजही परिसरातील सामाजिक व धार्मिक वातावरणात दिसून येतो.
संत तुकोबांनी या गावात टाळ ठेवले होते. त्यामुळेच या गावाला “टाळगाव चिखली” हे नाव पडल्याची स्थानिकांमध्ये श्रद्धा आहे. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर टाऊन हॉलला संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती.
महासभेत मंजूर झालेल्या या उपसूचनेनुसार, टाळगाव चिखली येथील टाऊन हॉल आता “जगद्गुरू संत तुकाराम महाराज टाऊन हॉल” या नावाने ओळखला जाणार आहे. स्थानिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ही उपसूचना भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी मांडली होती, तर नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी अनुमोदन दिले होते.

