इंधन बचत व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा महापौरांनी दिला नागरिकांना संदेश!

महापौर रवि लांडगे यांचा निवासस्थानापासून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत सायकलने प्रवास
पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज आपल्या निवासस्थानापासून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत सायकलने प्रवास केला. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांनाही शक्य तिथे सायकलचा वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इंधन बचतीच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.

आज सकाळी महापौर रवि लांडगे हे आपल्या निवासस्थानातून सायकलवरून महापालिकेकडे रवाना झाले. शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकलने प्रवास करत त्यांनी नागरिकांना इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. यावेळी महापालिकेचे सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप अभियंता अमित दीक्षित, महापौरांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले, संदीप पालांडे हे देखील त्यांच्यासमवेत होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या संदेशातून प्रेरणा घेत आजचा हा सायकल प्रवास करण्यात आला आहे. येथून पुढे आठवड्यातून एक दिवस सायकलने प्रवास करण्याचे नियोजन आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दैनंदिन जीवनात सायकलचा वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इंधन बचतीच्या सवयी अंगीकारून पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सायकलचा वापर हा केवळ इंधन बचतीसाठी नाही, तर निरोगी जीवनशैली, स्वच्छ हवा आणि पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाचा आहे. इंधन बचत हीच खरी राष्ट्रसेवा असून, पर्यावरणाचे संरक्षण आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात छोटे-छोटे सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येकाने छोट्या-छोट्या सवयींमधून योगदान देण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हरित उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी विविध मोहिमा राबवत असून, नागरिकांनीही या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी महापौर रवि लांडगे यांनी केले.

