फक्त मुद्द्याचं!

5th May 2026
पिंपरी-चिंचवड

दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उद्योग क्षेत्र एकत्र

दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उद्योग क्षेत्र एकत्र

पिंपरी चिंचवड महापालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने ‘मिशन संधी’ची दमदार सुरुवात
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेले दिव्यांग भवन हे केवळ आपल्या शहरापुरते मर्यादित न राहता, देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल म्हणून उभे राहत आहे. यामध्ये शहरातील उद्योगसमूह, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट क्षेत्राने ‘मिशन संधी’सारख्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे. केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून नव्हे, तर एक समावेशक आणि सक्षम समाज घडविण्याच्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अधिकाधिक संस्थांनी रोजगाराच्या संधी निर्माण करून, कौशल्य विकासाला चालना देऊन आणि सीएसआरच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना ठोस सहकार्य देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

vcc maharastra din
vcc maharastra din

पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने “मिशन संधी” या उपक्रमाचा शुभारंभ वाकड येथील हॉटेल सयाजी येथे उत्साहात पार पडला. दिव्यांग बांधवांना स्वयंपूर्ण, सक्षम आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाश्वत एम्प्लॉयर इकोसिस्टम उभारण्याच्या उद्देशाने वर्षभर चालणाऱ्या व्यापक मोहिमेची ही प्रभावी सुरुवात ठरली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापौर रवि लांडगे बोलत होते.

या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष अभय भोर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी तसेच विविध कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेले दिव्यांग भवन हे केवळ आपल्या शहरापुरते मर्यादित न राहता, देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल म्हणून उभे राहत आहे. २०२४ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यात यश मिळाले असून, त्यांच्या जीवनात सकारात्मक आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारा बदल घडत आहे. या यशामागे कॉर्पोरेट क्षेत्राचे आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून मिळालेल्या सहकार्याचे मोठे योगदान आहे. दिव्यांग भवनमध्ये २१ प्रकारच्या दिव्यांगत्वासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित थेरपी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे केंद्र केवळ उपचारापुरते मर्यादित न राहता, दिव्यांग बांधवांसाठी आत्मविश्वास, सन्मान आणि नव्या संधी निर्माण करणारे एक सक्षम व्यासपीठ ठरत आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, मिशन संधी आरंभ’ची आज झालेली सुरुवात ही केवळ एक प्रशासकीय उपक्रमाची सुरुवात नसून, ती सामाजिक बांधिलकीची नवी दिशा देणारा उपक्रम आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला विशेष आनंद आणि भावनिक समाधान मिळाले. आज येथे उपस्थित असलेल्या विविध कंपन्यांचे प्रतिनिधी दिव्यांग बांधवांविषयी अधिक संवेदनशील आणि जागरूक आहेत, हे पाहून सकारात्मक आशा निर्माण होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही जगातील एकमेव महानगरपालिका आहे जी दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून अशा प्रकारचा व्यापक आणि परिणामकारक उपक्रम राबवत आहे,

दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख म्हणाले, मिशन संधी आरंभ’ हा केवळ एक उपक्रम नसून, दिव्यांग बांधवांसाठी शाश्वत आणि सन्मानजनक उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याचा एक ठोस आणि दीर्घकालीन प्रयत्न आहे. दिव्यांगांना मदत करणे ही केवळ सामाजिक जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज नाही, तर त्यांना सक्षम मनुष्यबळ म्हणून मुख्य प्रवाहात स्थान देणे ही काळाची गरज आहे.

दिव्यांग उद्योजक भावेश भाटिया हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, दिव्यांगत्व ही मर्यादा नाही, तर वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची आणि स्वतःची ताकद ओळखण्याची संधी आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला, पण त्या अडचणींना कारण न बनवता, त्याच माझी प्रेरणा बनवली आणि उद्योग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. ‘मिशन संधी’सारखे उपक्रम हे त्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. केवळ अशा उपक्रमांपुरते मर्यादित राहून चालणार नाही, उद्योग आणि व्यावसायिकांनी दिव्यांगांकडे उत्तम मनुष्यबळ म्हणून पाहण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

दरम्यान, या उपक्रमांतर्गत कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, एचआर आणि सीएसआर प्रमुख, विविध स्वयंसेवी संस्था (एनजीओ), सामाजिक कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी यांनी एकत्र येत दिव्यांग समावेशन व रोजगार या विषयावर सखोल चर्चा आणि संवाद साधला. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता सहभागी संस्थांकडून दिव्यांगांच्या उपजीविकेसाठी ठोस आणि औपचारिक बांधिलकी (प्रतिज्ञा) स्वीकारण्यात आली,

या कार्यक्रमासाठी इन्क्लुझ्झा, बेंगळुरू या संस्थेने नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहिले तसेच दिव्यांग समावेशन आणि ऑपर्च्युनिटी मॉडेल संदर्भात मार्गदर्शन केले. याशिवाय, रोहिणी पीपल टेक्नॉलॉजी प्रा. लि. या संस्थेने इम्प्लिमेंटेशन पार्टनर म्हणून सहकार्य केले. जामध्ये कॉर्पोरेट संपर्क, सहभाग समन्वय व प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत कामकाजाचा समावेश होता.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"