विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका : पंकजा मुंडे

भाजप समोर केवळ विकासाचा मुद्दा
पिंपरी : भाजपची मुख्य भूमिका म्हणजे स्त्रीचा सन्मान आहे. स्त्रीशक्ती शिवाय शिव सुद्धा शून्य आहे. म्हणूनच भाजपने महिला भगिनींचा सन्मान करणारे स्त्री शक्तीयुग आणले. म्हणूनच महिला भगिनींनी आपल्या विकासाची ही निवडणूक हाती घ्यायची आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. विरोधक चुकीचे सांगतील मात्र या भूलथापांना बळी पडायचे नाही. भाजपचा विकासाचा मुद्दा आहे आणि याच मुद्द्यावर आपण भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यायचे आहे असे आवाहन पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी, आर.पी.आय. (आ.) मित्रपक्षातील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ विमल गार्डन, रहाटणी येथे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे उपस्थित होत्या. दरम्यान प्रभाग क्रमांक 22 मधील उमेदवार नीता पाडाळे, कोमल काळे, अॅड हर्षद नढे आणि विनोद नढे. प्रभाग 23 मधील उमेदवार मनीषा पवार ,तानाजी बारणे, सोनाली गाडे, अभिषेक बारणे, प्रभाग 24 मधील उमेदवार करिष्मा बारणे, सिद्धेश्वर बारणे, शालिनी गुजर, गणेश गुजर. प्रभाग क्रमांक 27 मधील उमेदवार बाबासाहेब त्रिभुवन, अर्चना तापकीर, सविता खुळे, चंद्रकांत नखाते. प्रभाग 28 शत्रुघ्न काटे, अनिता काटे, संदेश काटे, कुंदा भिसे या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही प्रचार सभा पार पडली.
या शहराने कायम विकासाच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विकासाची भूमिका ठामपणे मांडल्यामुळे गेल्या दहा वर्षात सर्वसामान्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचली आहे. उज्वला योजना, गरीब कल्याण योजना, जनधन योजना यांसारख्या योजनांमधून तळागाळातल्या वंचितांपर्यंत मदतीचा ओघ पोहोचला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना अंमलात आणली नसती तर आज आमच्या लाखो लाडक्या बहिणींचे पैसे थेटपणे त्यांच्या खात्यात जमा झाले नसते. याच माध्यमातून आलेली किसान योजना, बेटी बचाव बेटी पढाव या योजनेमधून आपण वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळेच भाजप म्हणजे विकास आणि विकास म्हणजे प्रत्येक घटकाची सुधारणा हे सूत्र आहे. असेही मुंडे म्हणाल्या.
भाजपने स्त्रीशक्तीचे युग आणले आहे. पालिकेच्या होणाऱ्या या निवडणुकांमध्ये हीच स्त्रीशक्ती भाजपच्या पाठीशी ढाल म्हणून उभी राहणार आहे असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

