सामाजिक कार्यकर्त्या सुशीला पारळकर यांचे निधन!

पिंपरी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या श्रीमती सुशीला भालचंद्र पारळकर (वय ९७) यांचे काल दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले. शुक्रवारी संध्याकाळी पिंपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे – मनोहर पारळकर (टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक) आणि विनायक पारळकर (महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी), दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

सुशीला पारळकर या कर्तव्यनिष्ठ, कष्टाळू आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणाऱ्या व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या. ग्रामीण जीवनाशी त्यांचे अतूट नाते होते. गावाकडे वास्तव्यास असताना शेतीची विशेष आवड जोपासत त्या स्वतः शेतीची कामे करत असत. शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून निसर्गाशी नाते जपण्याचा मार्ग आहे, अशी त्यांची ठाम भूमिका होती. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे अनेक महिलांना शेतीकडे आत्मविश्वासाने वळण्याची प्रेरणा मिळाली. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर सातत्याने काम केले. महिलांनी स्वावलंबी व्हावे, स्वतःची ओळख निर्माण करावी आणि सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या.

