कुदळवाडी, चिखली उद्योजकांचे पुनर्वसन करून नुकसान भरपाई मिळावी!

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेची उद्योगमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी : कुदळवाडी, चिखली या औद्योगिक परिसरातील उद्योजकांचे पुनर्वसन करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि आहे त्याच ठिकाणी औद्योगिक झोन जाहीर करावा किंवा औद्योगिक महामंडळाच्या जागेत पुनर्वसन करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक नवनाथ वायाळ, संजय सातव आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडी, पवारवस्ती, जाधववाडी, चिखली या औद्योगिक परिसरातील लघुउद्योजकावर बांधकामे निष्कासन कारवाई झालेली असून जवळपास सर्वच लघुउद्योजकांची बांधकामे पाडण्यात आलेली आहेत. त्यांच्या सर्व प्रकारच्या महागड्या मशीन देखील काढून घेण्यास वेळ दिलेला नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे लघुउद्योजकांचे व कामगारांचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. त्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झालेले आहे. सन 2019-20 ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वे प्रमाणे हा झोन महानगरपालिकेने प्रारूप आराखड्यामध्ये औद्योगिक झोन म्हणून जाहीर केलेला आहे. या परिसरातील जागा लघुउद्योजकांच्या स्वत:च्या मालकीच्या असल्यामुळे सदर जागेवर महानगरपालिकेच्या पूर्वीच्या गुंठेवारीच्या नियमानुसार रितसर परवानगी घेऊन बांधकाम केले जाईल. कारवाई केलेले अनेक उद्योजक पूर्वीच्या गुंठेवारी नियमाप्रमाणे बांधकाम परवाना मंजूर करून आपली इंडस्ट्री उभारण्याची इच्छा व्यक्त करीत आहे असे निवेदनात म्हटले आहे .

महापालिकेत एक वेगळा बांधकाम विभाग निर्माण करावा व पूर्वीच्या गुंठेवारी नियमानुसार बांधकाम मंजुरीसाठी नियमावली सुटसुटीत करून व त्वरित गुंठेवारी नियमाप्रमाणे परवानगी देणेबाबत निर्णय घ्यवा .लघुउद्योजकांसाठी आहे त्याच ठिकाणी कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी इंडस्ट्रीयल झोन जाहीर करावा, व त्वरित परवानगी देण्याची कार्यवाही व्हावी. उद्योग वाचवावेत तसेच बेरोजगार होणारे कामगारही वाचवावेत. सध्या ज्या लघुउद्योजकांची बांधकामे पाडलेली आहेत, त्यांचे वीज कनेक्शन सुरू करणेबाबत महावितरण कार्यालयास आदेश द्यावेत. जेणे करून मोठया कंपन्यांची ऑर्डर पूर्ण होईल व उद्योजकांची आर्थिक उलाढाल सुरळीत होईल .उद्योजकाने घेतलेल्या कर्जाचे हप्ते देखील वेळेवर भरता येतील. औद्योगिक परिसरातील कारवाईत लघुउद्योजकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. साधारणपणे एक गुंठयात शॉप असेल तर त्या उद्योजकाचे एक ते दिड कोटीचे रुपयांचे नुकसान झालेले आहे. महापालिकेने किंवा राज्य शासनाने प्रती गुंठा एक ते दिड कोटी रुपये प्रमाणे उद्योजकाना नुकसान भरपाई द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच महाराष्ट्र राज्यातील उद्योग मंत्रालय या परिसरातील उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आश्र्वसन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सघटना पदाधिकार्यांना दिले.