फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

शहर उपजिविका कृती आराखड्याअंतर्गत २१ व २२ मे रोजी होणार विशेष गट चर्चा !

शहर उपजिविका कृती आराखड्याअंतर्गत २१ व २२ मे रोजी होणार विशेष गट चर्चा !

दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेचा पथदर्शी उपक्रम
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली ‘शहर उपजीविका कृती आराखडा (City Livelihood Action Plan – C-LAP)’ तयार करण्यात येणार असून, या आराखड्याबाबत सखोल चर्चा व मार्गदर्शनासाठी दि.२१ व २२ मे २०२५ रोजी विशेष गट चर्चेचे आकुर्डी येथील ग दि माडगूळकर नाट्यगृहात आयोजन करण्यात आले आहे. या चर्चेमध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी, सामाजिक संस्था, खाजगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वसमावेशक व शाश्वत विकासासाठी हे चर्चासत्र महत्त्वपूर्ण असून, त्यातून मिळणारे अनुभव व सूचना शहर उपजीविका कृती आराखडा (C-LAP) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार असून दि.२६ ते ३१ मे या कालावधीत शहरातील लोकसंख्येचे वयोमान, लिंग प्रमाण, कामगारांची संख्या तसेच रोजगाराचे स्वरूप, औपचारिक व अनौपचारिक क्षेत्र आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, झोपडपट्टीवासी, दिव्यांग, तृतीयपंथीय, महिला वर्गाची सामाजिक व आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी प्रातिनिधीक स्वरूपात सर्वेक्षण देखील केले जाणार आहे.

viarasmall
viarasmall

शहर उपजिविका कृती आराखड्याचा उद्देश-
पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे सक्षमीकरण साध्य करण्यासाठी “शहर उपजीविका कृती आराखडा (City Livelihood Action Plan – C-LAP)” तयार करत आहे. हा आराखडा भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ (DAY-NULM) अंतर्गत तयार करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक शहराचे सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य वेगळे असल्याने, उपजीविकेच्या गरजाही त्या त्या शहरानुसार वेगळ्या असतात. त्यामुळे, शहरातील उपलब्ध साधनसंपत्ती, रोजगार क्षेत्र, श्रमशक्तीची उपलब्धता आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

हा कृती आराखडा शहरातील उपजीविकेच्या सद्यस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि पुढील पाच वर्षांमध्ये कोणत्या क्षेत्रात संधी निर्माण होऊ शकतात याचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यानुसार विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, पतपुरवठा, स्वयंरोजगार, वित्तीय साक्षरता, कौशल्य विकास व समाजकल्याण कार्यक्रमांची आखणी केली जात आहे.

शहर उपजीविका कृती आराखडा (C-LAP) हे शहराच्या समतोल, सहभागी आणि शाश्वत विकासासाठी एक महत्वाकांक्षी पाऊल आहे. या उपक्रमाचा अहवाल तयार करून राज्य शासनाला सादर करण्यात येणार असून या माध्यमातून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आत्मनिर्भर व सक्षम करण्यासाठी हातभार लागणार आहे. शिवाय, शहरातील विविध व्यावसायिक आस्थापना तसेच इतर उद्योगधंद्यांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यास देखील याद्वारे मदत मिळणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"