फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी ‘शैक्षणिक किट’!

महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी ‘शैक्षणिक किट’!

‘ई-रुपी’या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केले जाणार वितरण
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसांपासूनच म्हणजेच १५ जून २०२५ पासूनच शैक्षणिक साहित्यांचा समावेश असणारे एक किट देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक साहित्याचा अभाव असल्यामुळे अडचण येऊ नये, यासाठी लवकरात लवकर शैक्षणिक किटचे वितरण पूर्ण व्हावे, यादृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने नियोजन केले आहे.

त्या अनुषंगाने शैक्षणिक किट वितरण प्रक्रिया ई-रुपी (e-Rupi) या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पूर्ण केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) उपक्रमांतर्गत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्यामध्ये ई-रुपी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुरक्षित, रोखविरहित व्यवहार करून विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. या किटमध्ये यंदा पालक आणि शाळांकडून मिळालेल्या अभिप्रायाचा विचार करून काही नवीन वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या वस्तू या किटमध्ये आहेत. मागील वर्षी ई-रुपी प्रणाली अंतर्गत ५१ हजार २०३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले होते. तर, यावर्षी बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Vaiga Digital Creatives
Vaiga Digital Creatives

बालवाडीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार लाभ
यंदाच्या वर्षी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनाही डीबीटी योजनेचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता बालवाडीतील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक किट मिळेल. या किटमध्ये टिफिन बॉक्स आणि चित्र काढण्यासाठी उपयुक्त असे रंग, यासारख्या नवीन वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शाळांमध्ये उशिरा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी १० जुलैपासून दुसऱ्या टप्प्यातील वितरण सुरू होणार आहे.

अशी आहे ई-रुपी प्रक्रिया

  • ई-रुपी हे एक डिजिटल व्हाउचर असून यासाठी बँक खाते आवश्यक नाही
  • यामध्ये लाभार्थ्यांना एसएमएस द्वारे प्री-पेड क्युआर कोड व्हाउचर प्राप्त होते
  • हे व्हाउचर केवळ शाळा साहित्य खरेदीसाठीच वापरता येते
  • यासाठी फक्त १० अंकी वैध संपर्क क्रमांक आवश्यक
  • अतिरिक्त सुरक्षेसाठी ओटीपी द्वारे व्यवहार पडताळणी होते

थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसांपासूनच शैक्षणिक किटचे वितरण सुरू केले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डीबीटी यंत्रणेत सुधारणा करून आणि किटमध्ये उपयुक्त वस्तूंचा समावेश करून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी आमचे प्राधान्य आहे. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"