अनधिकृत इंटरनेट व टी.व्ही. केबल्सविरोधात महापालिकेचा इशारा!

महापालिकेच्या विद्युत खांबांवर पूर्वपरवानगीशिवाय ओढलेल्या केबल्स धोकादायक
संबंधित ऑपरेटर्सनी ३० दिवसांत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील दिवाबत्ती व्यवस्थेच्या महानगरपालिकेच्या खांबांवरून काही संस्था व व्यक्तींनी टी.व्ही. केबल तसेच इंटरनेटसंबंधित केबल्स अनधिकृतपणे ओढल्याचे निदर्शनास आले आहे. या केबल टाकण्यापूर्वी महानगरपालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसून, महापालिकेकडून अशा प्रकारची कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही, असे विद्युत विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या खांबांवरून अनधिकृतपणे ओढण्यात आलेल्या इंटरनेट व टी.व्ही. केबल्समुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या केबल्समुळे महानगरपालिकेच्या विद्युत खांबांचे व त्यावरील विद्युत व्यवस्थेचे नुकसान झाल्याच्या घटनाही घडल्या असून, यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या अनधिकृत केबल्समुळे शहराच्या सौंदर्यावरही विपरीत परिणाम होत असून, याबाबत अनेक नागरिक, अशासकीय सेवाभावी संस्था तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी व सदस्य यांनी महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार, महानगरपालिकेच्या खांबांवर पूर्वपरवानगीशिवाय ओढलेल्या इंटरनेट व टी.व्ही. केबल्स या महानगरपालिकेच्या मालमत्तेवरील अतिक्रमण मानले जाते.
सर्व कागदपत्रे ३० दिवसांच्या आत विद्युत विभागात सादर करावीत
प्रत्यक्षात, कोणतीही केबल टाकण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परवाना विभागाकडून रितसर परवाना घेणे बंधनकारक आहे. तसेच महानगरपालिकेकडून परवाना प्राप्त झाल्यानंतर, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीद्वारे उभारण्यात आलेल्या ‘ऑप्टिकल फायबर केबल’ (OFC) नेटवर्कचा वापर करणे अथवा त्या डक्टमधून केबल टाकणे आवश्यक असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणतीही नेटवर्क, टी.व्ही. केबल अथवा इतर प्रकारच्या केबल्स टाकण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधणे बंधनकारक राहणार आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत सर्व संबंधित केबल ऑपरेटर्स व इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांना पुढील कागदपत्रे त्वरीत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
1) वैध परवाना ,२) एमएसएमई / जीएसटी प्रमाणपत्र ,३) केबल ऑपरेटरचे पूर्ण नाव, संपर्क क्रमांक, स्थानिक कार्यालयाचा पत्ता पुरावा व शॉप अॅक्ट परवाना ,४) ऑपरेटरचे केवायसी तपशील – आधार कार्ड / पॅन कार्ड / ओळखपत्र माहिती ,५) महापालिकेच्या एसओपी नुसार काम करणे, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम पाळणे आदी बाबींसंदर्भातील योग्य रकमेच्या स्टॅम्प पेपरवरील हमीपत्र ,६) टी.व्ही. / इंटरनेट / दूरध्वनी / वीजपुरवठा व इतर प्रकारच्या केबल्स ओव्हरहेड किंवा अंडरग्राऊंड पद्धतीने कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत टाकण्यात आल्या आहेत, याची तसेच एकूण लांबीची माहिती, ७) ओव्हरहेड किंवा अंडरग्राऊंड केबलसाठी यापूर्वी महापालिकेस शुल्क अदा केले असल्यास त्याच्या पावतीची छायांकित प्रत ,८) केबल टाकण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या परवान्याची छायांकित प्रत
वरील सर्व कागदपत्रे ३० दिवसांच्या आत विद्युत विभाग, पहिला मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे सादर करावीत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत माहिती व कागदपत्रे सादर न करणाऱ्या केबल ऑपरेटर्सविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

