फक्त मुद्द्याचं!

19th May 2026
पिंपरी-चिंचवड

३० जूनपर्यंत मालमत्ता करावर विविध सवलती; नागरिकांनी घेतला लाभ!

३० जूनपर्यंत मालमत्ता करावर विविध सवलती; नागरिकांनी घेतला लाभ!

वेळेत कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे महापालिकेचे आवाहन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने शहरातील मालमत्ताधारकांसाठी मालमत्ता कर भरण्यावर विविध सवलती जाहीर करण्यात आल्या असून, नागरिकांनी या सवलतींचा लाभ घेत वेळेत मालमत्ता कराचा भरणा करावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे. ३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण कराचा ऑनलाईन भरणा करणाऱ्या नागरिकांना १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असून, कुटुंबातील महिलेच्या नावावर असलेल्या एका निवासी मालमत्तेला ३० टक्क्यांपर्यंत विशेष सवलतीचा लाभ देण्यात येत आहे.

viara vcc
viara vcc

महापालिकेच्या कर संकलन मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल १ लाख ८२ हजार ३३५ मालमत्ताधारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेतला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. महापालिकेने नागरिकांना घरबसल्या सुलभ पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ऑनलाइन भरण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षातील कर संकलनासोबतच थकीत कर वसुलीवरही विशेष भर देण्यात येत आहे. शहरातील मालमत्ताधारकांना कर भरण्याबाबत वेळेत माहिती मिळावी, यासाठी आतापर्यंत ६ लाख ६५ हजार ४७० मालमत्तांचे कर बिल वाटप करण्यात आले आहे. याशिवाय थकीत कर न भरलेल्या मालमत्ताधारकांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ३४ हजार १०८ थकबाकीदारांना जप्तीपूर्वीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

१ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत १ लाख ८२ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरला असून विविध कर सवलतींचा लाभ घेतला आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत १८३ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे.

यामध्ये १० टक्के ऑनलाइन सवलतीचा लाभ घेणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या जवळपास १ लाख ६५ हजार ४२४ इतकी असून, त्यांनी भरलेल्या मालमत्ता करातून १६९ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ऑनलाईन कर भरणा प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ वाचत असून, पारदर्शक व सोयीस्कर पद्धतीने कर भरण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचे महापालिकेच्या कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ३० जूनपूर्वी मालमत्ता कराचा भरणा करावा. ऑनलाईन पद्धतीने कर भरल्यास १० टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळत आहे. तसेच महिलांच्या नावावरील निवासी मालमत्तांसाठी विशेष सवलत उपलब्ध आहे. थकीत कर असलेल्या मालमत्ताधारकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तातडीने कर भरावा. नागरिकांनी वेळेत कर भरल्यास शहर विकासाच्या विविध प्रकल्पांना गती मिळण्यास मदत होईल. — सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"