एमआयडीसीतील पाणी,स्वच्छता व रस्ते प्रश्न तातडीने सोडवणार : आयुक्त डॉ.सूर्यवंशी

लघुउद्योग व उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक
पिंपरी : एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, घातक कचरा व्यवस्थापन तसेच लघुउद्योगांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. उद्योगधंद्यांना सक्षम, सुरक्षित आणि विकासपूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. एमआयडीसी भागांचा सर्वांगीण विकास हा महापालिकेचा प्राधान्यक्रम असून, मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा आणि कामांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे आश्र्वासन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात शहरातील लघुउद्योग संघटना तसेच एमआयडीसीमधील विविध उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याबैठकीत औद्योगिक क्षेत्रासमोरील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पायाभूत विकास आणि प्रशासकीय समन्वय यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी औद्योगिक क्षेत्रासमोरील विविध समस्या, प्रलंबित प्रश्न तसेच एमआयडीसी परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांबाबतच्या मागण्या आयुक्तांसमोर सविस्तर मांडल्या. उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने ठोस, नियोजनबद्ध आणि तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
कुदळवाडी, चिखली येथील लघुउद्योजकांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत अत्याधुनिक औद्योगिक पार्क बनवून उद्योजकांचे पुनर्वसन करून सर्व मूलभूत सोई सुविधा पुरवाव्यात. कुदळवाडी चिखली येथील लघुउद्योजकांचे पुनर्वसन करण्यासाठी उद्योग मंत्री, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PMRDA, प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित अधिकाऱ्या समवेत एक वेगळी बैठक घेण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना पदाधिकाऱ्याना दिले होते असे बेलसरे यांनी सांगितले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, मनोज सेठिया, उपायुक्त सिताराम बहुरे, व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अतुल पाटील, अजिंक्य येळे, परशुराम वाघमोडे, निवेदिता घार्गे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सीएसआर सेलचे मुख्य समन्वयक विजय वावरे, श्रुतिका मुंगी यांच्यासह लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष अभय भोर, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप, संजय सातव, नवनाथ वायाळ, डी. के. साळुंखे, तात्यासाहेब सपकाळ, नवनाथ बडे, मकरंद सदरे, बी. जी. औटी तसेच महिला लघुउद्योग संघटनेच्या दुर्गा भोर, जयश्री साळुंखे, रेश्मा मुल्ला, स्वाती मगर, वैभव जगताप आदी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एमआयडीसी परिसरात नियोजनबद्ध आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना तातडीच्या सूचना दिल्या. तसेच कचरा विलगीकरण, वेळेत कचरा संकलन आणि दैनंदिन स्वच्छता मोहिमेवर विशेष भर देत परिसर अधिक स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्याचे निर्देश दिले. लवकरच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत एमआयडीसी परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करून समस्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
औद्योगिक भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, खड्डेमुक्त रस्ते, सुकर वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षित औद्योगिक वातावरण निर्मितीसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. घातक कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
उद्योग क्षेत्राच्या समस्या प्रलंबित राहू नयेत यासाठी दर महिन्याला नियमित आढावा बैठक घेण्यात येईल. ‘उद्योग सारथी’ या उपक्रमाच्या माध्यमातून उद्योग संघटना आणि प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संवाद ठेवून स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल. शहरातील उद्योगवाढीस गती देण्यात येईल, असेही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

