प्रतिक रॉयल्स् संघाने पटकावला तिसरा क्रमांक!

दुसरी ‘पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ टी-२० क्रिकेट स्पर्धा; प्रतिक रॉयल्स्चा रूद्र पटेल सामनावीर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित दुसऱ्या “पिंपरी चिंचवड प्रिमीअर लीग’ (पीसीपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत रूद्र पटेल याने केलेल्या नाबाद ७४ धावांच्या जोरावर प्रतिक रॉयल्स् संघाने शेट्टी बन्ट् वॉरीयर्स संघाचा ९ गडी राखून पराभव करून तृतीय क्रमांक पटकावला.

हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा खेळणाऱ्या शेट्टी बन्ट् वॉरीयर्स संघाने १९ षटकात ८ गडी गमावून ११० धावा धावफलकावर लावल्या. श्रेयस जाधव (२५ धावा), हरीष बाकळे (२३ धावा), गणेश कालेल (२१ धावा) आणि सुशांत कांबळे (२० धावा) यांनी संघाचा डाव उभा केला. हे लक्ष्य प्रतिक रॉयल्स् संघाने ११.१ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. रूद्र पटेल याने ३७ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली. सईश शिंदे याने नाबाद ३८ धावांची खेळी केली. रूद्र आणि सईश यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६३ चेंडूत ११३ धावांची अभेद्य भागिदारी करून संघाचा विजय सोपा केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः तृतीय स्थानासाठीचा सामनाः
शेट्टी बन्ट् वॉरीयर्सः १९ षटकात ८ गडी बाद ११० धावा (श्रेयस जाधव २५, हरीष बाकळे २३, गणेश कालेल २१, सुशांत कांबळे २०, यैशेल कुच्चल ४-१५, मोहीत बिहादे ३-१९) पराभूत वि
प्रतिक रॉयल्स् : ११.१ षटकात १ गडी बाद ११४ धावा (रूद्र पटेल नाबाद ७४ (३७, ५ चौकार, ५ षटकार), सईश शिंदे नाबाद ३८ (२८, ४ चौकार); (भागिदारीः दुसऱ्या गड्यासाठी रूद्र आणि सईश यांच्यात ११३ (६३); सामनावीरः रूद्र पटेल; फायटर ऑफ द मॅचः पियुष ढोले.

