फक्त मुद्द्याचं!

19th April 2026
पिंपरी-चिंचवड

अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेची धडक कारवाई सुरूच!

अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेची धडक कारवाई सुरूच!

तीन दिवसांत ४५ हजार २८९ चौरस फूट अतिक्रमण हटविले
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब, क, इ, ग, व फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १५ ते १७ एप्रिल २०२६ रोजी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात धडक निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ४६ अनधिकृत बांधकामे व पत्राशेड निष्कासित करण्यात आले असून सुमारे ४५ हजार २८९ चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्यात आली. सुरक्षेच्या तसेच शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात आली.

vcc aksyay trutiya
vcc aksyay trutiya

‘ब’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत दि. १७ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग क्र. १८ चिंचवड येथे एकूण ९ अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २१,७९८ चौरस फूट क्षेत्रफळावरील अतिक्रमण हटविण्यात आले.

‘क’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत दि. १६ एप्रिल रोजी प्रभाग क्र. ६ भोसरी, सद्गुरूनगर परिसरात ३ अनधिकृत पत्राशेड (१६२ चौरस फूट) तसेच प्रभाग क्र. २ पुणे-नाशिक महामार्ग, बोऱ्हाडेवाडी परिसरात ४ पत्राशेड (१,५५० चौरस फूट) यावर निष्कासन कारवाई करण्यात आली. तसेच दि. १७ एप्रिल रोजी प्रभाग क्र. ६ भोसरी, सद्गुरूनगर परिसरातील ३ अनधिकृत आरसीसी बांधकामांवर कारवाई करून सुमारे २,०९९ चौरस फूट क्षेत्रफळ मोकळे करण्यात आले.

‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दि. १७ एप्रिल रोजी प्रभाग क्र. ०३ मोशी,डूडूळगाव येथे कारवाई पथकाद्वारे १ अनधिकृत पत्राशेड बांधकामावर कारवाई करण्यात आली. कारवाईत अंदाजे ६५० चौरस फूट क्षेत्रफळावरील अतिक्रमण हटविण्यात आले.

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत दि. १६ एप्रिल रोजी चिखली येथील प्राईम पार्क, शेलार वस्ती परिसरात नियमबाह्य व्यावसायिक बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ३,६६० चौरस फूट क्षेत्रफळावरील ८ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

‘ग’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत दि. १५ एप्रिल रोजी प्रभाग क्र. २७ मधील सिंहगड कॉलनी, सज्जनगड कॉलनी, ज्ञानदीप कॉलनी, न्यू डी.पी. रस्ता, शिवालय कॉलनी, रहाटणी येथे सुमारे ४,११२ चौरस फूट क्षेत्रफळावरील ७ अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवर तसेच नाल्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर दि. १६ एप्रिल रोजी प्रभाग क्र. २४ व २७ मधील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ५,४११ चौरस फूट क्षेत्रफळावरील ४ अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच दि. १७ एप्रिल रोजी प्रभाग क्र. २३ व २१ मधील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ५,८४६ चौरस फूट क्षेत्रफळावरील ७ अनधिकृत बांधकामे व पत्राशेड निष्कासित करण्यात आली.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तर क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर, अजिंक्य येळे, तानाजी नरळे, अतुल पाटील, किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली उपअभियंते, धडक कारवाई पथक, बीट निरीक्षक, एम. एस. एफ जवान, पोलीस कर्मचारी, महापालिका मजूर, ठेकेदार यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी जेसीबी ब्रेकर, ट्रॅक्टर ब्रेकर आदी उपकरणांचा वापर करण्यात आला.

दरम्यान, महानगरपालिकेकडून अशा प्रकारच्या अतिक्रमणांविरोधातील कारवाई सातत्याने सुरू राहणार असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"