फक्त मुद्द्याचं!

23rd June 2026
पिंपरी-चिंचवड

शाळा व महाविद्यालय परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेची कारवाई!

शाळा व महाविद्यालय परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेची कारवाई!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शैक्षणिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी विशेष मोहीम
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्या, पानटपऱ्या आणि तत्सम अतिक्रमणांवर विशेष कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात स्वच्छ, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.

viara vcc
viara vcc

या मोहिमेदरम्यान मोरवाडी, आकुर्डी, चिंचवड, जाधववाडी, भोसरी, इंद्रायणीनगर, खराळवाडी, लांडेवाडी, दापोडी, जुनी सांगवी, थेरगाव आदी परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या आजूबाजूला उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यांची पाहणी करण्यात आली. कारवाईदरम्यान एकूण ३५ अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या, तर अनेक टपरीधारकांनी कारवाईची सूचना मिळताच स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. त्यामुळे परिसरातील अनधिकृत व्यावसायिक उपक्रमांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात यश आले.

सदर कारवाई ही केवळ अतिक्रमण निर्मूलनापुरती मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य आणि तंबाखूमुक्त वातावरण निर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने शासकीय, निमशासकीय तसेच सार्वजनिक ठिकाणे तंबाखूमुक्त ठेवण्याबाबत वेळोवेळी निर्देश जारी केले आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शाळा व महाविद्यालय परिसरातील अतिक्रमणे, अनधिकृत व्यावसायिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा पोहोचविणाऱ्या बाबींवर नियमितपणे लक्ष ठेवण्यात येत असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार आहेत.

“विद्यार्थ्यांचे सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण राखणे ही महापालिकेची प्राथमिकता आहे. शाळा व महाविद्यालय परिसरातील अनधिकृत टपऱ्या आणि अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील. विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड होणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.”– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"