फक्त मुद्द्याचं!

15th June 2026
पिंपरी-चिंचवड

नैसर्गिक जलप्रवाह बाधित नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करण्याचे निर्देश!

नैसर्गिक जलप्रवाह बाधित नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करण्याचे निर्देश!

एमआयडीसी परिसरातील नाल्यांच्या स्थितीचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा
पिंपरी : एमआयडीसी परिसरातील नाल्यांवर झालेले अतिक्रमण आणि बुजविण्याच्या प्रकारांमुळे नैसर्गिक जलप्रवाह बाधित होत असून पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे एमआयडीसी व महापालिका अधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्त पाहणी करून अतिक्रमित व बुजविलेले नाले तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील नाल्यांची सद्यस्थिती, त्यावरील अतिक्रमणे तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्यांचा सखोल आढावा घेण्यासाठी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात महत्त्वपूर्ण बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी अर्चना पठारे, उप आयुक्त अण्णा बोदडे, प्रदीप ठेंगल, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कोतावाड, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे, अतुल पाटील, पूजा दुधनाळे, निवेदिता घार्गे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान एमआयडीसी परिसरातील जलनिस्सारण व्यवस्थेचे सध्याचे स्वरूप, अडथळे आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या नकाशांमध्ये दर्शविलेले अनेक नाले कंपन्यांकडून बुजविण्यात आले आहेत किंवा त्यावर अतिक्रमण करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणांमुळे नैसर्गिक जलप्रवाह अडथळित होत असून, पावसाळ्यात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि उद्योग तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना एमआयडीसी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्त पाहणी करून एमआयडीसी परिसरातील बुजविलेले किंवा अतिक्रमित नाले तसेच पाणी साचणारी ठिकाणे तात्काळ ओळखून त्यांची नोंद घेण्यात यावी. शिवाय, जुन्या नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेणे गरजेचे असून, ज्या ठिकाणी ते शक्य नाही तेथे पर्यायी स्वरूपात स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच, जलनिस्सारण मार्गांवर अतिक्रमण करणे ही गंभीर बाब असून यामुळे संपूर्ण परिसराच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. नाल्यांवर अतिक्रमण केलेल्या किंवा नाले बुजविलेल्या कंपन्यांनी अतिक्रमण काढून नाले पूर्वस्थितीत आणण्याबाबत कळविण्यात यावे. तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि वेळेत काम करण्याचे निर्देशही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"