‘वायसीएम’मध्ये स्वतंत्र ‘सेप्टिक ऑपरेशन थिएटर’ तातडीने सुरू करा!

संसर्गग्रस्त रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र सुविधेची गरज
पिंपरी : संसर्गजन्य जखमा आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र ‘सेप्टिक ऑपरेशन थिएटर’ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देऊन आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरीसह कालबद्ध कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ४० लाखांच्या घरात पोहोचली असून, वाढत्या लोकसंख्येसोबत सार्वजनिक आरोग्यसेवेवरील ताणही वाढत आहे. सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वायसीएम रुग्णालय हा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे येथील उपचार सुविधा अधिक सक्षम आणि अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे लांडगे यांनी नमूद केले आहे.
निवेदनानुसार, वायसीएम रुग्णालयात संसर्गजन्य जखमा असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र सेप्टिक ऑपरेशन थिएटरची आवश्यकता आहे. ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे काही रुग्णांना इतर रुग्णालयांत हलवावे लागते किंवा उपचारांना विलंब होतो. परिणामी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रवासाचा खर्च, आर्थिक भार आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. खासगी रुग्णालयांतील उपचार परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी ही परिस्थिती विशेषतः अडचणीची ठरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जागा, उपकरणे आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करा
स्वतंत्र सेप्टिक ऑपरेशन थिएटरसाठी आवश्यक जागा, उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि निधीचा तातडीने आढावा घेण्याची मागणी लांडगे यांनी केली आहे. संबंधित प्रस्तावास प्रशासकीय व आर्थिक मान्यता द्यावी. राज्य शासनाच्या मंजुरीची आवश्यकता असल्यास त्यासंबंधीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करून निश्चित कालमर्यादेत ही सुविधा सुरू करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही सुविधा कार्यान्वित होईपर्यंत संबंधित रुग्णांच्या उपचारांत खंड पडू नये, यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पर्यायी व्यवस्था करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

