पैसे पाठवल्याचा बनावट स्क्रीन शॉट दाखवून 6 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी: ऑनलाइन पैसे पाठवल्याचा बनावट स्क्रीन शॉट दाखवून 6 लाख 29 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार दिघी येथे उघडकीस आला आहे. ही घटना 18 मार्च रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कृष्णा सिल्वर वर्कशॉप सावंत नगर येथे घडली.
याप्रकरणी निलेश बाळकृष्ण जाधव (वय 46, रा. आदर्शनगर ,दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवेकानंद हातकामकर (वय 36, रा. महाड, जि. रायगड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून सुरुवातीला तीन लाख रुपये ऍडव्हान्स दिले. त्यानंतर नऊ लाख 29 हजार 780 रुपये किंमतीचे 59.870 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तयार करण्यास सांगितले .उर्वरित सहा लाख 29 हजार 780 रुपये यांनी एनईएफटी द्वारे पाठवल्याचा बनावट स्क्रीन शॉट दाखवून आरोपीने दागिने ताब्यात घेऊन पोबारा केला. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.

बनावट मीठ विक्री व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी : कंपनीच्या नावाने बनावट मीठ विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार एक ऑगस्ट रोजी मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आली.
याप्रकरणी कृष्णा देवीप्रसाद कनोजिया (वय 50, रा. मालाड, मुंबई) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .गोपाळ प्रभू रामजी प्रजापत (वय 28, रा. मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने मोशी येथील तुळशी ट्रेडिंग या दुकानात कंपनीच्या नावाने बनावट मीठ विक्रीसाठी साठवून ठेवले होते. त्यामुळे कंपनीच्या मालकीहक्काचे उल्लंघन झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

