कामगारावर चाकूने वार; एकास अटक!

पिंपरी : दुचाकी वरून कामावर जात असताना एक व्यक्ती रस्त्यात उभा होता, त्यास बाजूला हो मला जायचे असे म्हटल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दुचाकी स्वरावर चाकूचा वार करण्यात आला. ही घटना रविवार दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव तालमी जवळ घडली

या प्रकरणी राम बंडू आरड (वय 18, वैदू वस्ती, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषी माने, प्रणव इरकल, आदित्य शिंदे, नागेश चव्हाण (सर्व रा. वैदू वस्ती, पिंपळे गुरव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी क्रमांक दोन प्रणव इरकल यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दुचाकीवरून कामाला जात असताना आरोपी क्रमांक एक हा रस्त्याच्या मध्ये उभा होता. फिर्यादी याने त्याच बाजूला हो मला कामाला जायचे आहे असे म्हटले. आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीस शिवीगाळ करून तुझ्या बापाचा रस्ता आहे का असे म्हटला. त्यावेळी फिर्यादी व आरोपीमध्ये वाद झाला. आरोपीने फिर्यादीस थांब तुला दाखवतो अशी धमकी देऊन निघून गेला. मात्र नंतर फिर्यादी व फिर्यादीचा मित्र लक्ष्मण लोखंडे असे बोलत थांबले असता आरोपी क्रमांक एक ते चार असे दोन दुचाकीवरून तेथे आले त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपी क्रमांक एक याने त्याच्यासोबत आणलेल्या चाकू फिर्यादीस मारून जखमी केले. याशिवाय आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादीवर कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादीच्या मित्राने त्यास मागे ओढल्याने हा वार चुकला. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे तपास करत आहेत.

