फक्त मुद्द्याचं!

24th April 2026
पिंपरी-चिंचवड

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची जनगणना प्रशिक्षण केंद्रास भेट!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची जनगणना प्रशिक्षण केंद्रास भेट!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या जनगणना प्रशिक्षण मोहिमेअंतर्गत आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज ड क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक २६ मधील कै. मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा येथे आयोजित प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन प्रशिक्षण प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला.

viara vcc
viara vcc

यावेळी उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार तसेच चार्ज अधिकारी तथा क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे उपस्थित होते. आयुक्तांनी प्रगणक, पर्यवेक्षक आणि फील्ड ट्रेनर्स यांना दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती जाणून घेतली. प्रशिक्षणाची गुणवत्ता, कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांना जनगणना प्रक्रियेतील विविध टप्पे, घरगुती सर्वेक्षणाची पद्धत, अचूक माहिती संकलन तसेच नागरिकांशी प्रभावी संवाद याबाबत मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी पाहिले. तसेच डिजिटल साधनांचा वापर, ॲप-आधारित डेटा एन्ट्री आणि माहिती पडताळणी प्रक्रियेवर दिला जाणारा भर त्यांनी विशेषत्वाने नोंदवला. संवाद साधताना आयुक्तांनी जनगणना प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना स्वयं-नोंदणी करण्याचे आवाहन केले.

या प्रशिक्षणामुळे प्रगणक व पर्यवेक्षक अधिक सक्षम होत असून आगामी जनगणना प्रक्रियेसाठी ते आत्मविश्वासाने सज्ज होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली अचूक लोकसंख्यात्मक माहिती संकलित होण्यास मोठी मदत होणार आहे.

जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार असून त्यासाठी तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. अ, ब, क, ड, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आजपासून प्रशिक्षणास सुरुवात झाली असून इ आणि फ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्यापासून प्रशिक्षण सुरू होणार आहे.

जनगणना ही केवळ आकडेवारी संकलनाची प्रक्रिया नसून भविष्यातील विकासाचे दिशानिर्देशन करणारा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रगणक व पर्यवेक्षकाने अत्यंत जबाबदारीने, अचूकतेने आणि पारदर्शकतेने माहिती संकलन करणे आवश्यक आहे.या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना केवळ तांत्रिक बाबींचेच नव्हे, तर नागरिकांशी प्रभावी संवाद साधण्याचे कौशल्यही दिले जात आहे, असे उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार यांनी यावेळी सांगितले.

जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असून त्यावर देशाच्या विकासाचे नियोजन अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून अचूक व प्रामाणिक माहिती संकलनावर भर द्यावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण जनगणना पूर्ण करणे आवश्यक आहे. — डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"