जगद्गुरु तुकाराम महाराज बीज उत्सवानिमित्त वाहतुकीत बदल !

देहू : जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज यांच्या बीज उत्सवानिमित्त देहूगाव येथे 5 मार्च रोजी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक व नागरिक उपस्थित राहणार आहेत. या परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून चार ते सहा मार्च दरम्यान विशेष वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत .
जुना मुंबई -पुणे महामार्गावरील देहूगाव कमान ते देहू कडे जाणारा मार्ग (सार्वत्रिक बसेस व दिंडीतील वाहन व्यतिरिक्त) चार ते सहा मार्च दरम्यान बंद राहणार आहे. महिंद्रा सर्कल ते फिजिक्स कॉर्नर, कॅन्वे चौक, आयटी पार्क चौक, तळेगाव चाकण रोडवरील देहू फाटा ते देहूगाव मार्गे आयटी पार्क, कॅन्वे चौक ते काळोखे पाटील चौक, त्रिवेणी नगर चौक( निगडी), ते तळवडे चौक, डायमंड चौक ते देहू मार्गे तसेच 14 टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक, काळोखे पाटील चौक ते देहू मुख्य कमान आणि परंडवाल चौक या मार्गावरही वाहतूक निर्बंध लागू राहणार आहेत.
जुना पालखी मार्ग( केंद्र पाटील चौक ते झेंडे मळा जकात नाका) हा वनवे करण्यात येणार आहे. झेंडे मळ्याकडून केंद्र पाटील चौकाकडे प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून भक्ती शक्ती चौक, मोशी फाटा, एचपी चौक, संविधान चौक, कृष्णा नगर चौक, कुंडवडी सर्कल आदी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


