दोन गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीकडून 84 किलो अंमली पदार्थ गांजा जप्त!

अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेची कारवाई
चाकण : अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेकडून चाकण खंडोबा माळ, रुबी बेकरी बेकरी जवळ, ता. खेड येथे सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींकडून 41 लाख 98 हजार रुपये किंमतीचा 83 किलो 960 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई गुरुवार 18 जून रोजी करण्यात आली.

अनिकेत राजेंद्र बिरंगळ (वय 24, रा, खंडोबा माळ, चाकण, ता. खेड ),कुशल उद्धव पाठक (वय 24, रा. गल्ली नंबर 20, शिवसाई नगर, सुतारदरा, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .या दोन्ही आरोपी विरोधात चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे हे पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध विक्रीवर आळा घालून समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले असून त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन प्रवीण मोरे, अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार निखिल वर्पे व विजय दौंडकर हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना या दोन आरोपी बाबत संशय आला. त्यांनी त्यांची चौकशी करून झडती घेतली असता 41 लाख 98 हजार रुपये किंमतीचा 83 किलो 960 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा मिळून आला. या अंमली पदार्थ बरोबरच तीन मोबाईल फोन ,510 रुपये रोख, दीड लाख रुपये किंमतीची स्कार्पिओ गाडी असा एकूण 57 लाख 73 हजार 510 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की अंमली पदार्थाच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास अंमली पदार्थ विरोधी पथक पिंपरी चिंचवड 8600002320, पोलीस हेल्पलाइन 112 ,मानस हेल्पलाइन क्रमांक- 1933infoncbmanas@gov.in यावर संपर्क साधावा.

